मुंबई : महापालिकेच्या मालाड येथील कोंडवाड्यात बंदिस्त असलेल्या गुरेढोरांची देखभाल करण्यासाठी पालिकेने बिगर सरकारी पशु कल्याण संस्था, गोशाळा, सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी ॲनिमल्स (एसपीसीए) आदी संस्थाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित संस्थांना प्रत्येक गुरेढोरामागे मानधन देण्यात येणार आहे.

मुंबईतील पश्चिम उपनगरांत मोठ्या प्रमाणात जनावरांचे तबेले आहेत. तसेच रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे फिरत असतात. मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे उपद्रव होत असून याबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालिकेच्या कोंडवाडा विभागाकडून जनावरांना पकडून मालाड कॅटल पौडमध्ये सोडले जाते. मात्र, अशा गुरेढोरांचे मालक त्यांना सोडवण्यासाठी येत नसल्याने त्यांची देखभाल करणे पालिकेला अवघड होते. मात्र, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिकेने समाजिक संस्थांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिकेच्या पशू आरोग्य विभागाने जनावरांसाठी गोशाळा तसेच संबंधित संस्थांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. लवकरच त्यांची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती देवनार पशुवधगृहातील अधिकाऱ्यांनी दिली.

कोंडवाड्यात आणलेल्या मोकाट गुराढोरांना त्यांच्या मालकांनी १० दिवसांत सोडवून नेले नाही तर त्यांना देखभालीसाठी गोशाळेत पाठविण्यात येणार आहे. यासाठी गोशाळा आणि सामाजिक संस्था यांना मानधन देण्यात येणार आहे. यासाठी इच्छित संस्थांना १९ मार्चपर्यंत महाव्यवस्थापक पशु आरोग्य विभाग यांचे कार्यालय, देवनार पशुवधगृह या ठिकाणी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.