मुंबई : येत्या जुलै महिन्यात मुंबईतील बस सेवेला १०० वर्षे पूर्ण होत असताना जेजे पुलाखाली तीन साध्या डबल-डेकर बस धुळ खात उभ्या आहेत. ६९ लाख रुपये खर्चून उपहारगृह (कॅफेटेरिया),वाचनालय आणि कला दालनात (आर्ट गॅलरी) रूपांतरित झालेल्या या बसना आता टाळे लावले आहे. यामुळे एकेकाळी शहराची शान असलेल्या बस पुलाखाली नुसत्याच उभ्या करुन ठेवल्याने मुंबई महापालिका आणि बेस्टच्या कारभारावर मुंबईकर आणि बेस्ट प्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
उपनगरीय लोकलनंतर बेस्ट ही मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओखळली जाते. बेस्टच्या ताफ्यातील साध्या डबलडेकरच्या प्रवासाच्या असंख्य आठवणी मुंबईकरांच्या मनात आहेत. मरोळ डेपोमधून १५ वर्षांची सेवा पूर्ण करुन तीन साध्या डबलडेकर बस वर्ष २०२३ मध्ये निवृत्त झाल्या. वर्ष २०२१ च्या सुशोभीकरण मोहिमेचा भाग म्हणून या बस महापालिकेच्या बी वॉर्डला हस्तांतरित करण्यात आल्या. त्यानुसार या बसचे सार्वजनिक प्रदर्शनात रुपांतर करण्यासाठी ६९ लाख २३ हजारांचा खर्च करण्यात आला.
बेस्टच्या इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या या बस आज बंद अवस्थेत अडगळीत पडल्या आहेत. या गाडयांची काही प्रमाणात तोडफोड झाली आहे. बसवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. मुंबईकरांच्या आठवणीतील बस अशाप्रकारे पुलाखाली उभ्या करुन ठेवण्यात आल्याने मुंबईकर आणि बसप्रेमींनी महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत टीका देखील केली आहे. मुंबईतील डबल डेकर बस २९ पेक्षा जास्त हिंदी चित्रपटातूनही दिसली आहे.
हलते-फिरते संग्रहालय असते तर नागरिकांना,पर्यटकांना पाहता आले असते. आता या बस पुलाखाली उभ्या करुन ठेवल्या आहेत. प्रशासन बस भंगारात काढण्याची वाट पहात असावे असा प्रश्न पडतो – आत्माराम घोलप, मोहम्मद अली रोड
मुंबईचा वारसा धूळ खात पडला असल्याची खंत वाटते. प्रशासनाने या बसची डागडुजी-दुरुस्ती करुन त्या दक्षिण मुंबईत हेरिजेट पर्यटन बस म्हणून चालवाव्यात – सादिज शेख, मोहम्मद अली रोड
बेस्टच्या ताफ्यातील निष्कासित तीन दुमजली बसचा तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने सुमारे ६१ लाख रुपये खर्च करून वाचनालय, उपहारगृह व कला दालनात कायापालट केला. मात्र त्यानंतर जे. जे. उड्डाणपुलाखाली भेंडीबाजार-मांडवी येथे वापराविना उभ्या राहिल्या. प्रत्यक्ष पाहणीत ६० लाख खर्चाचे ठोस प्रतिबिंब दिसत नाही. इतक्या रकमेत बेस्टला स्वतःची नवी डिझेल बस खरेदी करता आली असती. त्यामुळे सार्वजनिक निधीच्या अपव्ययाची शक्यता असून वरिष्ठ स्तरावर सखोल चौकशी करावी. – रुपेश शेलटकर,अध्यक्ष, आपली बेस्ट आपल्याचसाठी
शहर सुशोभिकरणातंर्गत हा उपक्रम आहे. साध्या डबलडेकरमध्ये उपहारगृह,वाचनालय आणि कलादालन उभारण्यासाठी निविदा काढली आहे. – योगेश देसाई,सहाय्यक आयुक्त, बी वॉर्ड, महापालिका
‘बेस्ट’ची पहिली वाहतूक १५ जुलै १९२६ साली सुरू झाली. त्यापूर्वी मुंबईत ट्रॅम धावत होती. कालांतराने यात बदल होत गेले आणि सिंगल डेकर बसच्या जोडीला डबल डेकर बसही आल्या. बेस्टची पहिली डबल डेकर बस ८ डिसेंबर १९३७ साली सुरू झाली. सिंगल डेकर बसची प्रवासी क्षमता कमी असल्याने डबल डेकर गाड्या वाढवण्यावर बेस्टने भर दिला. पंधरा वर्षांचे आयुर्मान, तांत्रिक समस्या इत्यादी कारणांमुळे याची संख्या हळूहळू कमी होऊ लागली. सप्टेंबर २०२३ मध्ये अखेरची साधी डबल डेकर बस धावली.
बस कुठे उभ्या ?
पायधुनी जंक्शन – उपहारगृह (कॅफेटेरिया)
मिनारा मशिदीजवळील– वाचनालय (ग्रंथालय)
जेजे जंक्शन – कला दालन (आर्ट गॅलरी)
