मुंबई : न्यायालयाचे आदेश जाणीवपूर्वक आणि बेपर्वाईने न पाळणाऱ्या वकिलांना बाहेरचा रस्ता दाखवावा. तसेच, अशा वकिलांवर कठोर कारवाई करून इतर सदस्यांना ”न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करू नये” असा स्पष्ट आणि कठोर संदेश द्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच महाराष्ट्र आणि गोवा वकील संघटनेला दिले.

न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने वकील मंदार लालसरे यांच्या वतीने वरिष्ठ वकील गिरीश कुलकर्णी यांनी सादर केलेला माफीनामा अमान्य केला. संबंधित वकिलाचा माफीनामा स्वीकारण्याची वरिष्ठ वकिलाची विनंती आम्ही मान्य करू शकत नाही. अलीकडच्या काळात वकिलांमध्ये न्यायालयाचे आदेश जाणीवपूर्वक आणि अवमानकारकपणे दुर्लक्षित करण्याची किंवा उघडपणे न पाळण्याची, तसेच, न्यायालयाची दिशाभूल करून न्यायालयाचे अधिकार व प्रतिष्ठा कमी करण्याची प्रवृत्ती वाढताना दिसत आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने लालसरे यांचा माफीनामा फेटाळताना नोंदवले. वकिलांमध्ये एक समज रूढ झालेला दिसतो. त्यानुसार, त्यांना वाटते ते न्यायालयाचे आदेश जाणीवपूर्वक दुर्लक्षित करू शकतात किंवा मोडू शकतात आणि एखादे कारण पुढे करून त्यातून सुटूही शकतात. पकडले गेले आणि न्यायालयाचा रोष ओढवून घेतला, तर, स्वतः किंवा एखाद्या वरिष्ठ वकिलांमार्फत विनाअट माफी मागून मोकळे होऊ शकतात, अशी टिप्पणीही खंडपीठाने केली.

आतापर्यंत न्यायालयांनी वारंवार ”मोठेपणा” दाखवून अशा कृत्यांकडे दुर्लक्ष केले आहे आणि माफ केले आहे. परंतु, गेल्या काही वर्षांतील या मवाळ धोरणामुळे वकिलांची हिंमत वाढली असून ते न्यायालयाच्या आदेशांकडे बेपर्वाईने पाहू लागले आहेत. परिणामी, न्यायालयाच्या अधिकारांनाच हरताळ फासला जात आहे, असेही न्यायालयाने आदेशात सुनावले. वकील, त्यांचे पक्षकार, सरकारी संस्थांचे अधिकारी आणि अगदी सामान्य जनताही न्यायालयाच्या आदेशांकडे हलकेपणाने पाहताना दिसत आहे. त्यामुळे, आता हे थांबवणे अत्यंत गरजेचे आहे, अलीकडच्या काळात न्यायालयात हजर राहिलेल्या एका न्यायालयीन अधिकाऱ्याकडूनही गैरवर्तन झाल्याचे आम्ही पाहिले आहे. ही घसरण थांबवणे आणि बेईमान पक्षकार व न्यायालयाच्या कामकाजाचा यत्किंचितही आदर नसलेल्या वकिलांकडून न्यायालयाच्या अधिकारांची पायमल्ली रोखणे आम्हाला अनिवार्य वाटते. म्हणूनच अशा वकिलांवर कठोर कारवाई करून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून इतर सदस्यांना कठोर संदेश देणे आणि न्यायालयाची प्रतिष्ठा राखणे यासाठी याची जबाबदारी महाराष्ट्र व गोवा वकील संघटनेवर सोपवत आहोत, असे आदेश खंडपीठाने स्पष्ट केले.

प्रकरणाची पार्श्वभूमी

गेल्या आठवड्यात, २८ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान, प्रतिवादी बँकांपैकी एका बँकेचे प्रतिनिधित्व करणारे वकील लालसरे हे प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे न्यायमूर्तींनी त्यांना या प्रकरणाचे गांभीर्य समजावून सांगितले आणि त्यांना प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले. लालसरे यांनी औरंगाबाद खंडपीठासमोरील एका प्रकरणात उपस्थित राहायचे असल्याचे कारण दिले. मात्र, न्यायालयाने त्यांना बँकेच्या प्रादेशिक व्यवस्थापकासह दुपारच्या सत्रात न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले. तरीही लालसरे हे उपस्थित राहिले नाही आणि त्यांनी एका पर्यायी वकिलाला सुनावणीसाठी पाठवले. त्यामुळे न्यायालयाचा संताप झाला व न्यायालयाच्या आदेशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याबद्दल खंडपीठाने संबंधित वकिलाच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली.