मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावरून निवडक तपासणीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उच्च न्यायालयाच्या मुख्य इमारतीतील ”बॉम्बे बार असोसिएशन”च्या (बीबीए) उपहारगृहाने स्वेच्छेने आपली सेवा तात्पुरती थांबवली. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी या उपहारगृहाला भेट दिली होती. मात्र उपहारगृहाची सेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय स्वेच्छेने घेतला आहे आणि तो राज्य सरकारच्या नियामक प्राधिकरणाच्या कोणत्याही प्रतिकूल आदेशामुळे घेतलेला नाही, असे ”बॉम्बे बार असोसिएशन”तर्फे स्पष्ट करण्यात आले.

हे पाऊल संघटनेने स्वतःहून उचलले आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी दिलेल्या भेटीनंतर संघटनेला त्यांच्याकडून कोणताही प्रतिकूल संदेश, आदेश किंवा नोटीस मिळालेली नाही, असे बीबीएच्या सचिव नौशाद इंजिनीअर यांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले. उपहारगृहाची सेवा लवकरच पुन्हा सुरू केली जाईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अन्नसुरक्षेचे नियम सर्वत्र समानतेने लागू केले जात आहेत का, असा प्रश्न प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने बुधवारी नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलने एफडीएच्या परवाना निलंबनाच्या कारवाईविरोधात केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी उपस्थित केला होता. तसेच, मंत्रालय आणि उच्च न्यायालयातील उपहारगृहांसह सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांतील उपहारगृहांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. शिवाय, या तपासणीचा अहवाल कारवाईच्या चित्रफितीसह न्यायालयात सादर करण्याचेही स्पष्ट केले होते.

दरम्यान, एफडीएकडून तपासणीसाठी ”निवडक” ठिकाणे निवडली जात नाहीत, असे सरकारी वकील नेहा भिडे यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच, एफडीएने आतापर्यंत मुंबई महानगरपालिका, केईएम रुग्णालय, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आणि मुंबईतील इतर अनेक नामांकित क्लब्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या उपहारगृहांचीही तपासणी केली आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ती बंद करण्यात आली आहेत, असेही सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी (३१ जुलै) होणार असून, त्यावेळी एफडीएतर्फे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संबंधित आस्थापनांच्या उपहारगृहांतील तपासणीचा तपशील न्यायालयासमोर सादर करण्यात येण्याची शक्यता आहे.