मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची सर्वोच्च न्यायालयात बढती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने बुधवारी केंद्र सरकारकडे केली. गेल्या २२ आणि २७ मे रोजी पार पडलेल्या न्यायवृंदाच्या बैठकांमध्ये या शिफारसीचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला.
मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची जुलै २०२५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात बदली करण्यात आली होती. ऑगस्ट २०२५ मध्ये मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांची सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती झाल्यानंतर, श्री चंद्रशेखर यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी ९ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली.
यापूर्वी, मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे राजस्थान उच्च न्यायालयात कार्यरत होते. त्याआधी, २०१३ मध्ये झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी, त्यांनी जवळपास दोन दशके दिल्लीमध्ये वकिली केली होती. त्यानंतर त्यांनी झारखंड उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले आणि २०२४ मध्ये त्यांची राजस्थान उच्च न्यायालयात बदली करण्यात आली.
मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गुजरात येथील कुख्यात गुंड सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्याचा मुंबईतील सत्र न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला होता. मालेगाव येथे २००६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यातील हिंदुत्त्ववादी आरोपींची निर्दोष सुटका करण्याचा विशेष सत्र न्यायालयाचा निर्णयही मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने कायम ठेवला होता. याशिवाय, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरूद्ध दाखल गुन्ह्याचे प्रकरण देखील त्यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने रद्द केले होते.
