प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला १ लाख रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यासह (PR Bond) १४ अटींवर जामीन मंजूर करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयाने आज (२९ ऑक्टोबर) याबाबत सविस्तर निकालपत्र दिलं. गुरुवारी (२८ ऑक्टोबर) न्यायालयाने जामीन देण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे आता आज आर्यन खानसह तिघेही तुरूंगाच्या बाहेर येण्याची शक्यता आहे.

जामीन देताना न्यायालयाने घातलेल्या १४ अटी खालीलप्रमाणे,

१. प्रत्येक आरोपीला एक किंवा अधिक जामीनदारासह १ लाख रुपयांचा पी. आर. बँड द्यावा लागेल.
२. आरोपींनी त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार जे गुन्हे दाखल आहेत. त्या किंवा तशा इतर कोणत्याही कृतीमध्ये सहभागी होऊ नये.
३. आरोपींनी या गुन्ह्यातील सहआरोपी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क साधू नये.
४. आरोपींनी एनडीपीएस विशेष न्यायालयासमोर सुनावणी सुरू असलेल्या कोणत्याही गोष्टीत बाधा येईल अशा कृती करू नये.
५. आरोपीने स्वतः किंवा इतर कुणाच्या माध्यमातून साक्षीदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नये किंवा पुराव्यांशी छेडछाड करू नये.
६. आरोपींनी तात्काळ आपले पासपोर्ट विशेष न्यायालयाकडे जमा करावेत.
७. आरोपींनी विशेष न्यायालयासमोर सुरू असलेल्या प्रकरणावर कोणत्याही प्रकारच्या माध्यमांसमोर वक्तव्य करू नये.
८. विशेष न्यायालयाकडून परवानगी घेतल्याशिवाय आरोपींनी देश सोडून कुठेही जाऊ नये.
९. आरोपींना मुंबई बाहेर कुठेही जायचे असेल तर त्यांना तपास अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी लागेल. तसेच तपास अधिकाऱ्यांना आपल्या प्रवासाचे सर्व तपशील द्यावे लागतील.
१०. आरोपींना प्रत्येक शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान एनसीबीच्या मुंबई कार्यालयात हजर रहावे लागेल.
११. आरोपींना न्यायालयातील प्रत्येक तारखेला हजर रहावे लागेल. याला केवळ विशेष परिस्थितीत अपवाद असेल.
१२. आरोपींना एनसीबी तपासासाठी जेव्हा जेव्हा बोलावेल तेव्हा चौकशीसाठी हजर रहावे लागेल.
१३. खटला सुरू झाल्यानंतर आरोपीने ही सुनावणी प्रलंबित होईल किंवा उशीर लागेल असं काहीही करू नये.
१४. आरोपीने यापैकी कोणत्याही अटीचा भंग केल्यास एनसीबीला विशेष न्यायालयात जामीन रद्द करण्याचा अधिकार असेल.

हेही वाचा : Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला अखेर जामीन, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

आर्यन खानसाठी रोहतगी यांनी काय युक्तिवाद केला?

वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले, “अरबाजकडे काही आहे की नाही याविषयी आर्यनला कोणतीही माहिती नव्हती. वादासाठी हे माहिती होतं असं मानलं तरी सामूहिकपणे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडलं इतकंच म्हणू शकता. त्याला एनसीबी षडयंत्र म्हणत आहे. आर्यनविरोधातील कलम २७ अ हटवण्यात आलेलं नाही. आर्यनसोबतच्या ५-८ लोकांकडील ड्रग्जची बेरीज करून त्याला व्यावसायिक मात्रा म्हटलं जातंय.”

“क्रुझ शिपवर एकूण १३०० लोक, मग केवळ आर्यन आणि अरबाजचा संबंध कसा?”

“क्रुझ शिपवर एकूण १३०० लोक हजर होते. असं असताना एनसीबीने केवळ आर्यन आणि अरबाजमध्येच संबंध असल्याचं सांगितलंय. हा षडयंत्राचा आरोप योगायोग नाही, तर कटाचा भाग आहे. जहाजावर कुणाच्याही भेटीगाठी झालेल्या नाहीत त्यामुळे याला षडयंत्र म्हणता येणार नाही. हे सर्व एकत्र भेटणार आहेत, तेथे त्यांना ड्रग्ज मिळणार आहे आणि मग ते ड्रग्जचं सेवन करणार आहेत अशी चर्चा नाही. त्यामुळेच हा कट आहे,” असं मत रोहतगी यांनी व्यक्त केलं.

“जहाजावर कोणत्याही भेटीगाठी नाही, त्यामुळे षडयंत्र म्हणता येणार नाही”

“जर एखाद्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या रूममध्ये लोक आहेत. त्यांनी ड्रग्जचं सेवन केलं तर ते सर्व लोक षडयंत्राचा भाग आहेत असं म्हणता येईल का? या प्रकरणात षडयंत्र म्हणावं असा कोणताही पुरावा नाही. आर्यन केवळ अरबाजला ओळखत होता. याशिवाय इतर कुणालाही ओळखत नाही. तेथे सर्वांची भेट झाली हे सिद्ध करणं कठीण आहे. मात्र, वास्तवाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. षडयंत्र आहे हे दाखवण्यासाठी बैठक किंवा भेट होणं गरजेचं आहे. तिथं जाणीवपूर्वक ६ ग्रॅम ड्रग्ज सोबत बाळगलं असू शकतं. त्याचा षडयंत्राशी काहीही संबंध नाही.” असंही मुकुल रोहतगी यांनी नमूद केलं.