मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी राज्य सरकारच्या कोणकोणत्या योजना आहेत, असा प्रश्न करून त्यांचा तपशील सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिले.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दुष्काळ निधीप्रमाणे भूमिहीन शेतमजूर आणि अल्पउत्पन्न गटातील मजुरांसाठी तातडीची दुष्काळ निवारण मदत आणि सामाजिक सुरक्षा लाभांची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात कऱण्यात आली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर बुधवारी वेळेअभावी सविस्तर सुनावणी होऊ शकली नाही. तथापि, याचिकाकर्त्यांनी ही याचिका सादर केली असता, दुष्काळग्रस्तांसाठी असलेल्या सर्व योजनांचा तपशील सादर करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. या प्रकरणावर सुनावणी घेताना योजनांची स्पष्ट कल्पना न्यायालयाला येईल यासाठी हा तपशील सादर करण्याचे आदेश देण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, याचिकेवर १८ नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे.

महाराष्ट्राच्या ३५८ तालुक्यांपैकी ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर निर्माण झालेल्या गंभीर कृषी संकटाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी मजदूर संघटनेने वकील देवयानी कुलकर्णी यांच्यामार्फत याप्रकरणी जनहित याचिका केली आहे. जमीन महसूल माफी आणि पीक कर्ज पुनर्रचनेसारख्या मदत उपाययोजना जमिनीच्या मालकी हक्काच्या नोंदी आणि औपचारिक बँक कर्जांशी जोडलेल्या असल्याने भूमिहीन मजूर मदतीशिवाय वंचित राहिल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे, या शेतमजूर आणि अन्य कामगारांनाही तातडीने दुष्काळ निवारण उपाययोजना आणि सामाजिक सुरक्षा लागू करण्याचे आदेश सरकारला देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.