मुंबई : राष्ट्रध्वज उलटा फडकवून त्याचा अपमान केल्याचा आरोप असलेल्या ८५ वर्षांच्या व्यक्तीविरुद्धचा गुन्हा उच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला. याचिकाकर्ता केवळ त्याच्या निवासी सोसायटीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित समारंभाला उपस्थित होता, असेही न्यायालयाने त्याच्याविरुद्धचा गुन्हा रद्द करताना नमूद केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात तिरंगा उलटा फडकवण्यात आला. तथापि, या समारंभाला याचिकाकर्त्यांची फक्त उपस्थिती गुन्हा ठरत नाही, असे निरीक्षणही न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या एकलपीठाने नोंदवले. तसेच, याचिकाकर्त्याचे कोणतेही कृत्य राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचा अपमान करण्यासाठी किंवा त्याचा अनादर करण्यासाठी केल्याचे दर्शविणारी कोणतीही सामग्री सादर केली गेलेली नाही, असे देखील न्यायालयाने आदेशात म्हटले.
ध्वजाचा अनादर करण्याचा गुन्हा करण्यासाठी, हे कृत्य जाणूनबुजून करणे आवश्यक आहे. त्यामुळे तिरंगा फडकवण्याच्या ठिकाणी आरोपीची केवळ उपस्थिती ही राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा ठरणार नाही, असेही न्यायालयाने याचिकाकर्त्याविरुद्धचा गुन्हा रद्द करताना अधोरेखित केले.
प्रकरण काय ?
पोलिसांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी २०१७ मध्ये याचिकाकर्त्यासह अन्य रहिवासी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात जमले होते. त्या दिवशी सायंकाळी, परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांना तिरंगा उलटा फडकवल्याचे लक्षात आल्यानंतर याचिकाकर्ता आणि सोसायटीतील इतर पाच रहिवाशांविरुद्ध राष्ट्रीय सन्मान अपमान निवारण अधिनियम कायद्याच्या तरतुदींनुसार टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आपण ज्येष्ठ नागरिक असून वयोमानानुसार विविध आजारांनी आपल्याला ग्रासले आहे. आपण ध्वजवंदनाच्या समारंभाला उपस्थित होतो. तसेच गृहनिर्माण संस्थेच्या ज्या भागात ध्वज फडकवण्यात आला तो भाग सार्वजनिक जागेत येत नसल्याचा दावाही याचिकाकर्त्याने केला होता.

