मुंबई : अमरावती येथील औषधविक्रेते उमेश कोल्हे यांची २०२२ मध्ये झालेली हत्या, ही जनतेच्या मनात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती, असे सकृतदर्शनी मत उच्च न्यायालयाने मंगळवारी व्यक्त केले. तसेच या प्रकरणातील एका आरोपीला जामीन देण्यास नकार दिला. माजी भाजप सदस्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीला पाठिंबा देणारी समाजमाध्यम पोस्ट इतरांना पाठवल्याबद्दल कोल्हे यांची जून २०२२ मध्ये अमरावती येथे हत्या करण्यात आली होती, असा आरोप आहे.
अशा गुन्ह्यांमुळे समाजाच्या मूळ गाभ्यावर आणि सदसद्विवेकबुद्धीवर परिणाम होतो. समाज असुरक्षित होतो आणि सतत भीतीच्या छायेत जगण्यास प्रवृत्त होतो, असे मतही न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने व्यक्त केले. या प्रकरणी आरोपी असलेला पशुवैद्यकीय डॉक्टर युसूफ खान याने जामिनाच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
तथापि, त्याच्याविरुद्ध कथित गुन्हा केल्याचा सकृतदर्शनी पुरावा आहे, असे नमूद करून न्यायालयाने युसुफची याचिका फेटाळली.
युसुफ याच्यावरील आरोप सकृतदर्शनी खरे मानण्यास वाजवी कारणे आहेत, असे आमचे मत आहे. कोल्हे यांनी आपल्या धर्माचा कथित अपमान केल्याचा बदला घेण्यासाठी, आरोपींनी मुख्य आरोपीच्या नेतृत्वाखाली एक दहशतवादी टोळी तयार केली होती. त्यांनी कोल्हे यांची निर्घृण हत्या करून, शर्मा यांच्या टिप्पणीला पाठिंबा दिला होता की नाही याची पर्वा न करता, सामान्य जनतेच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे सकृतदर्शनी आपल्याला वाटत असल्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले. निःसंशयपणे, आरोप केलेला गुन्हा गंभीर आणि घृणास्पद स्वरूपाचा आहे, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली.
तसेच, या सकृतदर्शनी निष्कर्षावर पोहोचल्यानंतर, आम्ही युसूफ याच्या बाजूने जामिनाचा अधिकार वापरण्यास इच्छुक नाही, असेही न्यायालयाने त्याला दिलासा नाकारताना नमूद केले. युसुफ याच्या याचिकेनुसार, तो या हत्येमध्ये सामील नव्हता आणि त्यने फक्त इतर डॉक्टरांना कोल्हे यांच्या दुकानातून औषधे न खरेदी करण्यास सांगितले होते.
