मुंबई : जवळपास १६ वर्षे कोमात राहिलेल्या एकुलत्या एका मुलीला गमावणाऱ्या पालकांच्या वेदनांची भरपाई पैशांत होऊ शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आणि याचिकाकर्त्या वडिलांना मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (मॅक्ट) मंजूर केलेली सात लाख रुपयांच्या भरपाईच्या रक्कमेत ३७ लाखांपर्यंत वाढ केली.

ही घटना अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी असल्याचे निरीक्षण न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने नोंदवले. तसेच, २०१६ मध्ये मुलीच्या आईचे निधन झाले आणि तिच्या पश्चात मुलीची काळजी घेण्याची जबाबदारी एकट्या वडिलांवर येऊन पडली. त्यानंतर, जवळपास १६ वर्षे कोमात राहिलेल्या तरुण आणि एकुलत्या एक मुलीला गमवावे लागले. त्यामुळे, त्यांच्या वेदनांचे मोजमाप पैशांत किंवा कोणत्याही स्वरूपात करता येणार नाही. पालकांसाठी अशा प्रकारची वेदना ही असह्य असल्याचे निरीक्षणही न्यायमूर्ती जैन यांनी न्यायाधिकरणाच्या भरपाईच्या आदेशात बदल करताना नमूद केले.

न्यायाधिकरणाने कुटुंबाचा वैद्यकीय खर्च आणि घरी अंथरुणाला खिळलेल्या रुग्णाची काळजी घेण्याच्या दैनंदिन खर्चाचा पुरेसा विचार केला नाही. लघवीच्या बॅग्ज, कॅथेटर्स, फीडिंग ट्यूब्स, सिरिंज, डायपर्स, परिचारिका, औषधे आणि डॉक्टरांच्या भेटींवरील खर्च अपरिहार्य असल्याचेही न्यायालयाने आदेशात नमूद केले. एखादी व्यक्ती कोमामध्ये असल्यास त्याच्यावर विविध प्रकारचा खर्च करावाच लागतो आणि त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही किंवा हे खर्च झालेच नाहीत, असे म्हणता येणार नाही. उपचार खर्च मागणाऱ्या व्यक्तीने प्रत्येक खर्चाचा तपशीलवार हिशेब ठेवावा आणि त्याला मूळ देयकांचा आधार असावा. अशी अपेक्षा करणे अस्वीकारार्ह आहे. विशेषतः सामाजिक कल्याणाशी संबंधित कायद्यांतर्गत प्रकरणावर विचार करताना हा दावा करणे चुकीचे असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने विमा कंपनीचा युक्तिवाद फेटाळून लावताना नोंदवले.

कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर, न्यायालयाने जून २००३ पासून कोमात असलेल्या मुलीचा मृत्यू होईपर्यंतच्या कालावधीसाठी कुटुंबाचा दैनंदिन शुश्रूषेचा खर्च ६०० रुपये निश्चित केला आणि त्याच बाबीसाठी ३५ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर केली. न्यायालयाने वाहतूक, वैद्यकीय खर्च आणि वेदना व शारीरिक – मानसिक त्रासांच्या नुकसानभरपाईच्या रकमेतही वाढ केली. विमा कंपनीला ही वाढीव रक्कम सहा टक्के वार्षिक व्याजासह १२ आठवड्यांच्या आत याचिककर्त्याला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

प्रकरण काय ?

नाशिकमधील मुंबई नाका परिसरात ५ मार्च २००३ मध्ये मारुती ओमनी व्हॅनने धडक दिल्याने १२ वर्षांच्या तृप्ती कावळे हीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तिला २४ जून २००३ रोजी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. पुढे ५ फेब्रुवारी २०१९ रोजी तिचा मृत्यू होईपर्यंत ती जवळपास १६ वर्षे कोमात होती.