मुंबई : सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) म्हणून कार्यरत असताना बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडे पाच महागड्या गाड्या असणे. त्याने मुंबई पोलीस आयुक्तालयांतील कार्यालयातील व अगदी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर सुद्धा मर्सिडीजमधून प्रवास करणे आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य करत होता याकडे मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी लक्ष वेधून आश्चर्य व्यक्त केले. तसेच, एका एपीआयच्या वेतनात हे शक्य आहे का ? असा प्रश्न करून न्यायालयाने वाझे याच्यावरील खंडणीच्या आरोपांचीही यावेळी दखल घेतली.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटके आणि व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या खून प्रकरणात वाझे याला सत्र न्यायालयाने गेल्या आठवड्यात जामीन मंजूर केला होता. हा जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे गुरुवारीही एनआयएच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी, गणवेशधारी पोलिसांवर गुन्ह्याचा आरोप होतो, तेव्हा त्याची सचोटी आणि त्याचे वागणे यासारख्या इतर अनेक पैलूंचाही विचार करणे आवश्यक असते, असेही न्यायालयाने नमूद केले.

एनआयएच्या वतीने बाजू मांडताना अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी सुनावणीत युक्तिवाद करताना प्रकरणातील साक्षीदारांचे जबाब वाचून दाखवले. त्यात, वाझे मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यूसारख्या आलिशान गाड्या चालवायचा, असे म्हटले होते. त्याची न्यायालयाने दखल घेतली व सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) पदावर असताना वाझे अशा आलिशान गाड्या कशा चालवू शकत होता ? असा प्रश्न उपस्थित केला. एका एपीआय पदावरील व्यक्तीने मर्सिडीजमधून मुंबई पोलीस आयुक्तालयांतील आपल्या कार्यालयात जाणे. इतकेच नाही मर्सिडीजमधून मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर जाणे हे आश्चर्यकारक असल्याची म्हटले.

वाझे याच्या ओबेरॉय हॉटेलमधील तीन महिन्यांहून अधिक काळाच्या वास्तव्याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. ओबेरॉय हॉटेलमध्ये १०० दिवस राहणे किंवा तिथे खोली बुक करणे त्याला कसे शक्य झाले ? एपीआयच्या पगारात हे सर्व शक्य आहे का ? एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याचे मासिक उत्पन्न किती असते ? अशी प्रश्नांची सरबत्ती न्यायालयाने यावेळी केली. त्यावर, एपीआयचे वेतन हे ९० हजार रुपयांपेक्षा जास्त नसेल, असे सिंह यांनी न्यायालयाला सांगितले. तेव्हा, या सर्व गोष्टींचा संबंध अखेरीस वाझे याच्यावरील खंडणीच्या आरोपांशी जोडलेला असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

वाझेकडे जिलेटिनच्या कांड्या आल्या कुठून ?

अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारी २०१६ रोजी जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली एक एसयूव्ही गाडी आढळली होती. तथापि, या जिलेटिनच्या कांड्या वाझे याने कुठून खरेदी केल्या होत्या, याची माहिती एनआयएला होती का ? जिलेटिनच्या कांड्या कुठून खरेदी केल्या गेल्या, हे दर्शवणारा काही पुरावा किंवा माहिती उपलब्ध आहे का ? अशी विचारणाही खंडपीठाने केली. तसेच, विक्रीसाठी परवाना लागतो, तसाच खरेदीसाठीही परवान्याची आवश्यकता असू शकते याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. मात्र, या कांड्या कुठून मिळवल्या गेल्या याची माहिती तपास यंत्रणेला नाही आणि वाझे याने तपासात सहकार्य केले नाही, असे एनआयएच्या वतीने सिंह यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला.

वाझेला जामीन दिल्यास अडचण काय ?

वाझे हा पाच वर्षांहून अधिक काळ कोठडीत आहे, ही बाब लक्षात घेता, कठोर अटींवर त्याला जामीन दिल्यास काय अडचण किंवा नुकसान होईल ? अशी विचारणा न्यायालयाने अतिरिक्त महान्यायअभिकर्त्यांकडे केली. त्यावर, वाझे याच्यासारख्या व्यक्तीसाठी कोणतीही अट पुरेशी कठोर ठरणार नाही. त्याचे वर्तन पाहता, तो साक्षीदारांना धमकावण्याचा किंवा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी भीती सिंह यांनी व्यक्त केली. वाझे याच्यावर यापूर्वी बनावट चकमकप्रकरणीही खटला दाखल आहे. तो एक पोलीस अधिकारी होता आणि त्याचे कर्तव्य जनतेचे रक्षण करणे हे होते. परंतु, त्याने स्वतःच गुन्हेगारी कृत्ये केली असून त्याने केवळ भीती आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही, तर एका व्यक्तीचा खूनही केला आहे, असेही अतिरिक्त महान्यायअभिकर्ता यांनी न्यायालयाला सांगितले. एनआयए वाझेवरील खटला त्वरित सुरू करण्यास तयार आहे आणि त्यात केवळ १५० साक्षीदारांची साक्ष घेतली जाईल, असेही एनआयएने न्यायालयाला सांगितले.