मुंबई : प्रभादेवी येथील ‘श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासा’साठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या भरपाईपोटी मिळालेली १०.९४ कोटी रुपयांची रक्कम जमीन मालक आणि त्यांचे दीर्घकालीन भाडेकरू ‘सदानंद गॅरेज’ यांच्यात समप्रमाणात वाटून देण्याचे महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.

न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठाने हा निर्णय देताना, विशेष भूसंपादन अधिकाऱ्याने रेडी रेकनर’ दरांच्या आधारे केलेले मूल्यमापन फेटाळून लावले. तसेच, १९ सप्टेंबर २००२ रोजीच्या बाजारभावानुसार, ६४२.९८ चौरस मीटर भूखंडाचे मूल्य १,७०,२०० रुपये प्रति चौरस मीटर इतके निश्चित केले. भाविकांसाठी प्रतीक्षा कक्ष आणि ‘भक्ती निवास’ बांधण्यासाठी राज्य सरकारने ही जमीन संपादित केली होती.

जमीन अधिग्रहण कायद्याच्या कलम २३ अंतर्गत खुल्या बाजारभावाचे मूल्य निश्चित करण्यासाठी अशा दरांना कोणताही कायदेशीर आधार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, परिसरातील तत्सम मालमत्तांच्या प्रत्यक्ष नोंदणीकृत व्यवहारांचा आधार घेऊन जमिनीचे मूल्य निश्चित केले व जमिनीसाठी १०.९४ कोटी रुपयांची भरपाई निश्चित केली. जमिनीवरील बांधकामे आणि झाडांसाठी मालकांना स्वतंत्रपणे ३.८५ लाख रुपये देण्याचे आदेश दिले.

या रकमेच्या वाटपावरून वाद निर्माण झाला होता. जमीन मालकांनी संपूर्ण भरपाईची मागणी केली होती, तर ‘सदानंद गॅरेज’ने १९७१ पासून जमिनीवर ताबा असल्याचे सांगून ७५ टक्के वाटा मिळण्याची मागणी केली होती. तथापि, ‘सदानंद गॅरेज’ने आपली कायदेशीर भाडेकरू म्हणून स्थिती आणि व्यावसायिक ताबा सिद्ध केला असला तरी संपूर्ण खुल्या भूखंडावर त्यांचा मालकी हक्क किंवा कायमस्वरूपी भाडेपट्टा असल्याचे ते सिद्ध करू शकले नाहीत, असे न्यायालयाने नमूद केले. तसेच, मालमत्तेचे मूल्यमापन करताना त्यावर असलेल्या प्रत्यक्ष बंधनांचा विचार होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, मालमत्तेवर भाडेकरूचा ताबा असतो, तेव्हा जमीन पूर्णपणे रिकामी आणि त्यांच्या स्वतःच्या ताब्यात होती, अशा अर्विभावात जमीन मालक भरपाईची मागणी करू शकत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

म्हणून भरपाईची रक्कम समान प्रमाणात

प्रकरणातील वस्तुस्थिती पाहता भरपाईची रक्कम समान प्रमाणात वाटून घेणे योग्य ठरेल, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला. तसेच, जमीन मालकांकडे मालमत्तेचे महत्त्वपूर्ण मालकी हक्क होते, परंतु हे हक्क ‘सदानंद गॅरेज’च्या प्रस्थापित भाडेकरूत्वाच्या आणि ताबा हक्कांच्या अधीन होते, असेही न्यायालयाने हा निष्कर्ष देताना स्पष्ट केले. याव्यतिरिक्त, न्यायालयाने ‘सेंच्युरी डेव्हलपर्स’चा भरपाईचा दावा आणि संभाव्य सदनिका खरेदीदारांनी केलेली वाटपाची मागणीही फेटाळून लावली. तसेच, पक्षकारांना स्वतंत्र करारात्मक उपाययोजनांचा अवलंब करण्याची सूचना करताना सक्षम प्राधिकरणाला आठ आठवड्यांच्या आत भरपाईची रक्कम वितरित करण्याचे आदेश दिले.