मुंबई : दक्षिण मुंबई, वरळी किंवा नरिमन पॉइंट परिसर स्वच्छ आहे म्हणून संपूर्ण मुंबई स्वच्छ असल्याचे म्हणता येणार नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई महापालिकेला खडेबोल सुनावले. तसेच, रस्ते, पदपथ, मोकळ्या जागा आणि डोंगर उतारांवर कचरा टाकण्याचे प्रकार अद्यापही सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि मुंबईतील २४ विभागांतील आरोग्य व स्वच्छता व्यवस्थापनाचा कृती आराखडा सादर करण्याचे आदेश दिले. याशिवाय, केईएमसह महापालिका व राज्य सरकारच्या रुग्णालयांत संसर्गजन्य आजार, डेंगी, मलेरिया, एच १ एन १ आदींमुळे दाखल झालेल्या रुग्णांची आकडेवारीही सादर करण्यास सांगितले.
नुकतेच उत्तनच्या दिशेने जात असताना जोगेश्वरी, मालाड परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा व अस्वच्छता पाहिल्याचेही न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने नमूद केले. जोगेश्वरीत ही समस्या अधिक गंभीर आहे. राम मंदिर स्थानक परिसरातूनही अनेक तक्रारी येत आहेत, असे न्यायालयाने म्हटले. तसेच, वरळी किंवा दक्षिण मुंबई स्वच्छ आहे, म्हणजे संपूर्ण मुंबई स्वच्छ आहे असे नाही, असा टोला न्यायालयाने महापालिकेला लगावला. त्याचवेळी, कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक ठिकाणी यंत्रणा व रस्तारोधक लावण्याचे आदेशही दिले.
मुंबईतील अस्वच्छेतवर देखरेख ठेवण्यास प्रतिबंध नाही
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा दाखला देत स्वच्छतेच्या प्रश्नावर देखरेख करण्यास मर्यादा असल्याचा युक्तिवाद महापालिकेतर्फे करण्यात आला. मात्र, मुंबईतील स्वच्छतेवर देखरेख करण्यास आम्ही कोणताही प्रतिबंध केलेला नाही, असे स्पष्ट करत खंडपीठाने हा स्थानिक प्रशासनाचा विषय असल्याचे नमूद केले. कचरा रस्त्यांवर, पदपथांवर किंवा डोंगर उतारांवर टाकला जाणार नाही, याची जबाबदारी महापालिकेचीच असल्याचेही न्यायालयाने बजावले. शहरातील नियमित स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचा दावा महापालिकेतर्फे करण्यात आला. त्यावर, आम्हाला परिस्थितीत फारशी सुधारणा दिसत नाही, असे न्यायालयाने नमूद केले व नागरिकांनी स्वतःहून कचरा कचरापेटीत टाकावा, अशी सवय निर्माण करायची असेल तर त्यासाठी महापालिकेने प्रथम ठोस यंत्रणा उभी करणे आवश्यक असल्याचेही खंडपीठाने सुनावले.
स्वच्छता अभियानाचाही आढावा
– गेल्या २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीला स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली असतानाही महापालिकेने स्वच्छ मुंबईसाठी काय उपाययोजना केल्या, याची माहिती देण्याचे आदेश न्यायालयाने यावेळी दिले.
– २ ऑक्टोबर हा दिवस गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती, स्वच्छता अभियान आणि जागतिक शांतता दिन या चार कारणांनी महत्त्वाचा असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
– न्यायालयाने यापूर्वी कांजूरमार्ग येथील कचरा प्रक्रिया केंद्राशी संबंधित याचिकेची व्याप्ती वाढवून त्यात संपूर्ण मुंबईतील आरोग्य व स्वच्छतेचा समावेश केला आहे. त्यामुळे आता २४ विभागांतील परिस्थितीवरही न्यायालय लक्ष ठेवणार आहे.
– महापालिकेने केलेल्या उपाययोजनांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन न्यायालयाने पुढील सुनावणी २२ ऑक्टोबर रोजी ठेवली.
