मुंबई : आदेश विरोधात गेल्याने संतप्त झालेल्या एका महिला पक्षकाराने आपली पर्स मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या दिशेने भिरकवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार बुधवारी घडला. संबंधित महिला पक्षकाराने लगेच स्वतःला सावरले. मात्र, या घटनेने न्यायमूर्ती जामदार यांच्या न्यायदालनात काही वेळ खळबळ उडाली.
आदेश पारित केल्यानंतर महिला पक्षकराकडून केली जाणारी कृती लक्षात येताच, प्रकरणाची सुनावणी करत असलेल्या न्यायमूर्ती जामदार यांनी त्वरित उच्च न्यायालयात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पाचारण केले आणि संबंधित महिलेला न्यायालयातून बाहेर काढण्याचे आदेश दिले.
हे काय प्रकारचे वर्तन आहे ? न्यायालयात काहीही करू शकतात असे पक्षकारांना वाटते का ? आपल्या विरोधात एखादा आदेश गेला म्हणजे तुम्ही असे वागणार का ? अशी नाराजीही न्यायमूर्ती जामदार यांनी व्यक्त केली आणि न्यायालयाची प्रतिष्ठा राखणे आवश्यक असल्याचे अधोरेखीत केले. त्याचवेळी, पक्षकारांपर्यंत एक कठोर संदेश गेला पाहिजे, असे नमूद करून, हे न्यायालय कोणत्याही भीतीला किंवा दबावाला बळी पडून किंवा कोणाच्या तरी फायद्यासाठी कधीही कोणताही आदेश देणार नाही, असे न्यायमूर्ती जामदार यांनी तोंडी टिप्पणी करताना स्पष्ट केले.
न्यायालयाच्या अवमान प्रकरणी कारवाई होणार
अंधेरीस्थित मिंदर गुरमीत सिंग ठुकराल नावाची ही महिला आपल्या कुटुंबीयांसह न्यायालयात उपस्थित होती. तिने त्वरित लेखी माफीनामा सादर केला. त्यानंतर तिला न्यायालयातून बाहेर काढण्यात आले. मात्र, या माफीनाम्याने न्यायमूर्तींचे समाधान झाले नाही. त्यांनी संबंधित महिला पक्षकारावर दंड आकारण्याचे संकेत दिले आणि तिच्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई सुरू केली जाईल, असे स्पष्ट केले.
तर कारागृहात पाठवू
ठुकराल हिने न्यायालयात अत्यंत अयोग्य वर्तन केले असून ते न्यायालयाच्या अवमानास पात्र ठरते. सर्व प्रतिवादींच्या वर्तनाबाबतच्या या अवमान याचिकेची सुनावणी आता ३० ऑक्टोबर रोजी होईल, असेही न्यायालयाने म्हटले. याव्यतिरिक्त, न्यायालयात अत्यंत अयोग्य वर्तन केल्याबद्दल आपण संबंधित पक्षकाराला कारागृहात पाठवू शकतो, अशी तोंडी टिप्पणीही न्यायमूर्तींनी केली.
