Mumbai Hit-and-Run Case : मुंबईत एक १७ वर्षीय मुलगा चालवत असलेल्या एसयूव्हीने एका स्कूटरला धडक दिली होती. या अपघातात जखमी झालेल्या ३३ वर्षीय तरुणाचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अपघाताच्या १० दिवसानंतर या तरुणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. मृत्यू झालेला तरुण धुर्मिल पटेल यांची पत्नी मिनल पटेल यांची प्रकृतीदेखील चिंताजनक आहे. दरम्यान या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट आता समोर आली असून बाल न्याय मंडळाने (Juvenile Justice Board) या प्रकरणात गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर केला आहे. विशेष बाब म्हणजे आगामी १२ बोर्डाच्या परीक्षेचे कारण देत ही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
५ फेब्रुवारी रोजी विद्याविहार भागातील सोमैय्या कॉलेजजवळ, कथितपणे अल्पवयीन मुलगा वेगाने चालवत असलेल्या किया सेल्टॉस (Kia Seltos) कारने या दाम्पत्याच्या स्कूटरला जोरात धडक दिली होती. या घटनेत हे जोडपे गंभीर जखमी झाले.
मुंबई पोलिसांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, “मुंबईत ५ फेब्रुवारीच्या रात्री विद्याविहार भागात कार अपघातात गंभीर जखमी झालेले धुर्मिल पटेल यांचा काल रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेली त्यांची पत्नी मीनल पटेल यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.”
टिळक नगर पोलिसांनी मोटार व्हेइकल अॅक्टच्या कलम १८४ आणि १९९ आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १२५, १२५(अ), १२५(ब) आणि २८१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अपघात झाला ती एसयूव्ही मुलाचे वडील वालजी राजा भूषण यांच्या मालकीची असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान गाडी चालवत असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर म्हणजेच ४३ वर्षीय वालजी राजा भूषण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर मुख्य आरोपी अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
धुर्मिल प्रेमजी पटेल (३३) आणि त्यांची पत्नी मीनल पटेल (३२) स्कूटरवरून घरी परतत होते, यावेळी समोरून येणाऱ्या एसयूव्ही गाडीने त्यांना धडक दिली, अशी माहिती मुंबई पोलिसांनी वृत्तसंस्था एएनआयला दिली.
अपघात घडला ती परिस्थिती आणि कारचा वेग निश्चित करण्यासाठी घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
