मुंबईत गुरूवारी रात्रीपासून पडणा-या संततधार पावसामुळे शहर आणि उपनगराचे जनजीवन शुक्रवार सकाळपासून पूर्णपणे कोलमडले. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक सकाळपासून बंद असल्याने अनेकांचे हाल झाले. शुक्रवारी संध्याकाळी पश्चिम मार्गावरील लोकल वाहतूक धीम्यागतीने सुरू झाली. मात्र, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक बंदच आहे. दरम्यान, पावसाळ्याच्या पूर्ण मोसमात पडतो त्याच्या दहा टक्के पाऊस एकाच दिवसात झाल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी दिली. १५ दिवसांच्या कालावधीत एवढा पाऊस पडणे अपेक्षित असते, असेही त्यांनी सांगितले. शॉर्ट सर्किटमुळे सायनमध्ये दोघे जण मृत्युमुखी पडल्याची माहितीही त्यांनी दिली.
मुंबईत विविध ठिकाणी पाणी साचल्याने त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही झाला. पावसाचा जोर कमी होईपर्यंत रेल्वेसेवा सुरु करणार नसल्याचे मध्य रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. रेल्वेसेवा कोलमडल्याने बेस्टतर्फे जादा अडीचशे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी टर्मिनसहून ठाण्यापर्यंत आणि हार्बर मार्गावर मानखुर्दपर्यंत जाणारी अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरची लोकलसेवा सकाळपासून बंद आहे. ठाणे ते वाशी मार्गावरील लोकल सेवा सध्या सुरू आहे. त्याचबरोबर कल्याणहून कर्जत आणि कसाऱयाच्या दिशेने काही सेवा सुरू असल्याचे मध्ये रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
एकीकडे लोकल वाहतूक ठप्प झाली असताना दुसरीकडे रस्त्यावरही अनेक ठिकाणी पाणी साचल्याने अनेक गाड्या बंद पडल्या. दादर, परळ, माटुंगा, हिंदमाता आदी भागामध्ये पाणी साचल्याने तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सकाळी या मार्गांवर काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली होती.
उद्याही शाळांना सुटी
पावसाचा अंदाज घेऊन मुंबईकरांनी गरज नसल्यास शनिवारीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन अजय मेहता यांनी केले आहे. त्याचबरोबर शुक्रवारप्रमाणे शनिवारीही मुंबईतील सर्व शाळांना सुटी देण्याची सूचना त्यांनी खासगी शाळांना केली आहे. मुंबई महापालिकेच्या शाळा शनिवारी बंद राहणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा रद्द
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सकाळी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. पावसामुळे त्यांनी आपला नियोजित कोल्हापूर दौराही रद्द केला.
शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा रद्द
शिवसेनेचा ५० वा वर्धपानदिन शुक्रवारी संध्याकाळी साजरा करण्यात येणार होता. मात्र, पावसामुळे तो कार्यक्रमही रद्द करण्यात आला.
हवाई वाहतुकीवर परिणाम
पावसामुळे पाणी साचल्याचा फटका काही प्रमाणात हवाई सेवेलाही बसला. मुंबई विमानतळावरील विमाने अर्धातास उशीराने उड्डाण करीत आहेत.
पाणी उपसण्याचे काम वेगात
दादर, कुर्ला, हिंदमाता, वडाळा, माटुंगा, सांताक्रूज या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले आहे. पावसाच्या पाण्यामुळे अनेक गाड्या बंद पडल्या आहेत. मुंबईतल्या रस्त्यांवरही जागोजागी पाणी साचले असून, ११९ पंपाद्वारे साचलेले पाणी उपसण्याचं काम सुरू असल्याचं महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या घडामोडी
* मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाचे शुक्रवारी होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत.
* सरकारी कर्मचाऱयांना शक्य असेल तरच त्यांनी कार्यालयात यावे, अशी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांची सूचना.
* पाऊस कमी होत नाही, तोपर्यंत मध्य आणि हार्बर रेल्वेची सेवा सुरू होणार नाही
* बेस्टचे वाहक, चालक, अभियांत्रिकी कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी जवच्या आगारात जाऊन काम करू शकतात, अशी बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांची सूचना
* रेल्वेसेवा बंद पडल्याने बेस्टकडून लांब पल्ल्यासाठी बसगाड्या चालविल्या जात आहेत
* मुंबईच्या अनेक भागात पावसामुळे वीजपुरवठा खंडीत. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न
* रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी.
* लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या विविध ठिकाणी अडकल्याने दूरवरून आलेल्या प्रवाशांचाही खोळंबा
* मुंबई उच्च न्यायालयाला एक दिवसाची सुटी. पावसामुळे कामकाज बंद ठेवण्याचा मुख्य न्यायमूर्तींचा निर्णय
* मुंबई विमानतळावरून विमानाचे उड्डाण अर्धा तास उशीराने
* लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांची वाहतूक हळूहळू सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रयत्न
* पाण्याच्या निचरा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या पंपिंग स्टेशननंतरही विविध ठिकाणी पाणी साचल्याने सर्वसामान्यांचे हाल