वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये महाकाय जाहिरात फलक कोसळला होता. या अपघातात १७ मुंबईकरांचा हाकनाक बळी गेला. याप्रकरणी फलक लावलेल्या जाहिरत कंपनीच्या व्यवहाराचा तपास मुंबई पोलिसांकडून करण्यात येतोय. या तपासादरम्यान, तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या पत्नी सुमन्ना कैसर खालिद यांचंही नाव आता समोर आलं आहे. सुमन्ना यांच्या व्यावसायिक सहकाऱ्याने लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं समोर आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) असे आढळून आले आहे की, “बेकायदा १४०*१२० फूट होर्डिंगची मालकी असलेल्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने २०२१ ते २०२२ दरम्यान १० वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ३९ व्यवहारांद्वारे ४६.५ लाख रुपये पाठवले आणि सर्व अर्शद खान नावाच्या एका व्यक्तीने ते पैसे घेतल्याचे समोर आले आहे.

द इंडियन एक्स्प्रेसने ऍक्सेस केलेले रजिस्ट्रार ऑफ कंपनी (आरओसी) रेकॉर्ड दाखवतात की अर्शद खान हे महपारा गारमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सुमन्ना केसर खालिद यांच्यासह सह-संचालक आहेत. कैसर खालिद यांनी निविदा जाहीर न करता होर्डिंगला परवानगी दिली होती. रेकॉर्डवरून असेही दिसून आले आहे की दोघांची (अर्शद खान आणि सुमन्ना खालिद) २८ जून २०२२ रोजी मुंबईस्थित कंपनीचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. इंडियन एक्स्प्रेसने होर्डिंगसाठी मंजुरीबद्दल प्रतिक्रियेसाठी खालिद यांच्याशी संपर्क साधला होता. परंतु, त्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, “तीन होर्डिंगसाठी इगो मीडिया कंपनीला कंत्राट देण्यात आलं होतं. तर, चौथ्या होर्डिंगसाठी जो कोसळला होता, त्याची औपचारिक निविदा प्रक्रिया न करता इगो मीडियालाच त्याच अटी आणि शर्तींवर कंत्राट देण्यात आलं”, असं खालिद यांच्या जवळच्या सूत्राने म्हटलं आहे.

एसआयटीच्या तपासावर देखरेख करणारे मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे डीसीपी विशाल ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही या तपासावर भाष्य करण्यास नकार दिला. परंतु, पोलीस सूत्रांनी सांगितले की, “कंपनीशी कथितपणे लिंक नसलेल्या व्यक्तींच्या बँक खात्यांमध्ये इगो मीडियाने पाठवलेल्या पैशांचाही तपास केला जाणार आहे.”

“गेल्या काही वर्षांमध्ये इगो मीडियाने केलेल्या व्यवहारानुसार एसआयटीला कंपनीशी कोणत्याही प्रकारे संबंधित नसलेल्या व्यक्तींचे एकूण ४६.५ लाख रुपयांचे ३९ व्यवहार आढळून आले. या प्रकरणातील आरोपी भावेश भिंडे आणि कंपनीतील इतरांना विचारले असता त्यांनी सांगितले की, अर्शद खानने त्यांना धनादेश प्राप्तकर्त्यांची नावे न सांगता देण्यास सांगितले होते. नंतर, कंपनीला सुमारे १० खात्यांमध्ये धनादेश जमा झाल्याचे आढळले”, सूत्रांनी सांगितले.

“एसआयटीने नंतर खातेदारांशी संपर्क साधला असता ते आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे आढळून आले. शिवाजी नगरमध्ये राहणारा अर्शद खान हा त्यांच्या ओळखीचा असून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी त्याने त्यांच्या बँक खात्यांची माहिती मागितल्याचे त्यांनी सांगितले. हे पैसे अखेर अर्शद खानने स्वतःच काढले, असेही त्यांनी सांगितले. त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

एसआयटी आता अर्शद खान, कैसर खालिद आणि इगो मीडिया यांच्यातील कथित संबंधांची चौकशी करत आहे, असे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी सांगितले की, “या प्रकरणावर स्पष्टता येण्यासाठी टीम सर्व संबंधितांचे जबाब नोंदवेल. एसआयटी इगो मीडिया आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अभियंता यांच्यातील कथित संबंधांची चौकशी करत आहे, ज्याने कंपनीला बीएमसीच्या कायदा विभागाकडून होर्डिंगवर “अनुकूल अहवाल” देण्याचं आश्वासन दिलं होतं.

होर्डिंगा बेकायदा असल्याचे सांगणाराही भावेश भिंडेच्या संपर्कात

होर्डिंग बेकायदेशीर असल्याचे घोषित करणारा अभियंताही भावेश भिंडेच्या संपर्कात होता हेही पुढे स्पष्ट झाले आहे. या अभियंताने खासगी चिट फंडातून ४५ लाखाचे असुरक्षित कर्ज देण्यास भिंडेला मदत केली होती”, असंही सूत्रांनी सांगितले.

पालिकेच्या नोटीसचीही चौकशी होणार

एसआयटीला असेही आढळले आहे की होर्डिंग कोसळल्यानंतर लगेचच, स्थानिक बीएमसी वॉर्ड ऑफिसने १३ मे रोजी संध्याकाळी ६.१५ च्या सुमारास इगो मीडियाला नोटीस पाठवली आणि एकूण ६.१४ कोटी रुपयांची थकबाकी भरण्याची मागणी केली. एसआयटी नोटीसच्या वेळेची तपासणी करत आहे. तसंच, या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता आहे.