मुंबई : रंग, गुलाल उधळत मंगळवारी मुंबईकरांनी धुळवडीचा आनंद लुटला, मात्र त्याचवेळी विविध ठिकाणी होळी खेळताना ४५ जण जखमी झाले. काही ठिकाणी झालेल्या मारहाणीच्या घटनांमुळे जखमींच्या संख्येत वाढ झाली. तसेच, एका ठिकाणी झालेल्या मारहाणीच्या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याने धुळवडीला गालबोट लागले. जखमींपैकी अनेकांच्या डोळ्याला, डोक्याला व पायाला मार लागला आहे. या सगळ्यांना रुग्णालयांमध्ये प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. धुळवड खेळताना जखमी होणाऱ्यांची संख्या यंदा फारच कमी आहे. गेल्यावर्षी ही संख्या ९३ होती.

मुंबईमध्ये सोमवारी होळी, तर मंगळवारी धुळवड मोठ्या उत्साहात साजरी झाली. मंगळवारी ग्रहण असल्याने धुळवड साजरी करण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. मात्र मुंबईकरांनी बिनधास्तपणे धुळवड साजरी केली. धुळवड साजरी करताना नैसर्गिक रंग व पाण्याचा अधिक वापर केल्याने फारशा दुखापती होण्याच्या घटना घडल्या नाहीत. तथापि, डोळ्यात रंग जाणे, धुळवड खेळताना पडल्याने डोक्याला मार लागणे अशा विविध कारणांमुळे ४५ जण जखमी झाले. मात्र यंदा अनेक ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्याने जखमी झालेल्यांची संख्या वाढली.

वडाळा ट्रक टर्मिनल येथील तुषार उंजनवाल (१८) या तरुणाला होळी खेळताना आयमॅक्स सिनेमागृहाजवळ आठ ते १० जणांनी जबर मारहाण केली. त्याला तातडीने शीव रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या मारहाणीत त्याच्या डाव्या पायाच्या बोटांना, हाताच्या मधल्या बोटांना दुखापत झाल्याचे, तसेच चेहऱ्याच्या उजव्या बाजूला बोथट शस्त्राने हल्ला केल्याचे आढळले. धारावीमध्ये भांग पिऊन प्रकृती बिघडलेल्या तिघांना शीव रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणण्यात आले. त्याचप्रमाणे एका तरुणाच्या उजव्या हाताला, तर एकाच्या डाव्या पायाला मार लागला होता. जखमी अवस्थेत आलेल्या पाचजणांवर उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी दिली.

कूपर रुग्णालयामध्ये तीन रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. त्यातील एक ३५ वर्षांची महिला होळी पेटवताना भाजल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर अन्य एकाच्या हाताला व दुसऱ्याच्या मणक्याला मार लागला. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कूपर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देव शेट्टी यांनी दिली.

केईएम रुग्णालयाच्या अपघात विभागामध्ये पाच जणांवर उपचार करण्यात आले. यामध्ये चार लहान मुले असून, तिघेही धुळवड खेळत असताना पडल्याने त्यांना दुखापत झाली. तर, एका पाच वर्षांच्या मुलाच्या त्वचेवर रंगामुळे पुरळ उठले. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. सर्वांची तपासणी करण्यात आली असून योग्य उपचार सुरू असल्याची माहिती केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली.

सोमवारी रात्री व मंगळवारी सातजणांना धुळवडीदरम्यान दुखापत झाल्याने नायर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यातील दोघांच्या डोळ्याला तर एकाच्या डोक्याला दुखापत झाली. इतरांना किरकोळ जखमा झाल्या. या सगळ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले. धुळवड खेळताना डोळ्यात रंग गेला म्हणून जे.जे. रुग्णालयामध्ये तीन जणांना उपचारासाठी आणण्यात आले होते. त्यांनाही उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी दिली.

सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये तीन जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये एकाच्या डोक्याला मार लागला, तर फोर्ट परिसरात झालेल्या मारहाणीमध्ये एका व्यक्तीच्या डोक्यात बियरची बाटली फोडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी दिली. जी.टी रुग्णालयामध्ये सात जणांवर अपघात विभागामध्ये उपचार करण्यात आले. यातील एकाला दुचाकीने धडक दिली. तर दोघे अतिमद्यपानामुळे पडून जखमी झाले होते. तर एकाच्या डोळ्याला आणि दोघांच्या पायाला दुखापत झाली होती. या सगळ्यांवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.