मुंबई: मुंबई महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या उपनगरीय रुग्णालयांपैकी १७ रुग्णालये आणि ३० प्रसूतिगृहांमध्ये कंत्राटदाराद्वारे थाळी पद्धतीने जेवण पुरविले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस पुरवठा बंद करण्यात आल्याने या कंत्राटदारांसमोर रुग्णांना जेवण कसे पुरवायचे? याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने कंत्राटदार चिंतेत असून मुंबई महानगरपालिकेने याकडे लक्ष न दिल्यास रुग्णांवर उपाशी राहण्याची वेळ येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेने केईएम, शीव, नायर, कूपर या मोठ्या रुग्णालयांसह शिवडी क्षयराेग रुग्णालयामध्ये महानगर गॅसची वाहिनी टाकली आहे. त्यामुळे या रुग्णालयांमधील रुग्णांसाठी जेवण बनविण्यात येत असलेली स्वयंपाकगृहे व्यवस्थित सुरू आहेत. परिणामी, या रुग्णालयांमधील रुग्णांना नेहमीप्रमाणे जेवण दिले जाणार आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेने काही उपनगरीय रुग्णालये आणि प्रसूतिगृहांमध्ये जेवण पुरविण्यासाठी खासगी कंत्राटदारांची नेमणूक केली आहे.
या कंत्राटदारांकडून आतापर्यंत रुग्णांना दररोज जेवण पुरविण्यात येत आहे, मात्र गॅस कंपन्यांनी व्यावसायिकांचा गॅस पुरवठा बंद केल्याने कंत्राटदारांकडील गॅस सिलिंडरचा साठा संपत आला आहे. काही कंत्राटदारांकडे दोन दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा आहे, तर काही कंत्राटदारांकडील गॅस सिलिंडर संपलेले आहेत. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने जेवण पुरविण्यात येणाऱ्या रुग्णालयातील रुग्णांवर येत्या दोन दिवसांमध्ये उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
व्यावसायिकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा न करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर आम्हाला गॅस सिलिंडर उपलब्ध होणे बंद झाले. या निर्णयापूर्वी जे गॅस सिलिंडर आधीच आमच्याकडे उपलब्ध होते, त्यावरच आतापर्यंत जेवण पुरवणे शक्य झाले. सध्या दोन दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे उद्यापर्यंत सिलिंडर न मिळाल्यास रुग्णांना जेवणाचा पुरवठा करणे अवघड होऊ शकते. रुग्णांना जेवण पुरवण्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विविध पर्यायांची पडताळणी करीत आहोत, असे एका कंत्राटदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
ॲक्वर्थ कुष्ठरोग रुग्णालयाचे गॅस संस्थेला पत्र
मुंबई महानगरपालिकेमार्फत कुष्ठरोग रुग्णांसाठी ॲक्वर्थ कुष्ठरोग हे स्वतंत्र रुग्णालय चालविण्यात येते. या रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण हे कायमस्वरुपी वास्तव्यास असतात. सद्यस्थितीमध्ये असलेल्या गॅसच्या तुटवड्यामुळे या रुग्णालयाच्या स्वयंपाकगृहातही गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांना आवश्यक दैनंदिन आहार बनविण्यासाठी स्वयंपाकगृहात सद्यस्थितीत ११ गॅस सिलेंडरची आवश्यकता आहे. त्यामुळे रुग्णालयाची गरज लक्षात घेता सिलिंडर पुरविण्यात यावेत. जेणेकरून रुग्णांच्या दैनंदिन आहाराची गैरसोय होणार नाही, असे पत्र रुग्णालय प्रशासनाकडून गॅस पुरवठा करणाऱ्या गॅस संस्थेला देण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये गॅस सिलिंडरचा साठा उपलब्ध
राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालय, जी.टी. रुग्णालय, कामा रुग्णालय व सेंट जॉर्जेस या रुग्णालयांमध्ये रुग्णांना जेवण पुरविण्यासाठी असलेल्या उपहारगृहांमध्ये गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जी. टी. रुग्णालयामध्ये सात सिलिंडर असून, आणखी आठ खरेदी करण्यात येणार आहेत. तर कामा रुग्णालयामध्ये १५ आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये ८ गॅस सिलिंडर उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
