मुंबई : इराण-इस्त्रायल युद्धामुळे व्यावसायिक गॅसची टंचाई निर्माण झाल्याने त्याचा परिणाम आता हॉटेल व्यवसायावर झाला आहे. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे वितरण थांबल्याने त्यावर अवंलबून असलेल्या हॉटेल्सची कोंडी झाली आहे . गेल्या दोन दिवसांपासून गॅस सिलिंडर मिळतनसल्याने मुंबईतील तब्बल २० टक्के हॉटेल्स बंद ठेवण्याची नामुष्की हॉटेल व्यावसायिकांवर ओढावली आहे.
तर अशीच परिस्थिती आणखी दोन-तीन दिवस राहिल्यास शहरातील ५० टक्के हॉटेल बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.परिणामी खवय्यांसह नागरिकांचे हाल होण्याची चिन्हे आहेत.इराण-इस्त्रायल युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसत आहे. हवाईसह समुद्री वाहतुकीचा बोजवारा उडाल्यानंतर आता गॅस तुटवडा निर्माण झाला आहे. युद्धाचा गॅसपुरवठा साखळीला फटका बसला आहे. देशात गॅसचा तुटवडा वाढत आहे.
व्यावसायिक वापराच्या गॅस विक्रीवर निर्बंध आले आहेत. सरकारने गॅसपुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा होत नसल्याचे हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनांचे म्हणणे आहे. व्यावसायिक सिलिंडर पुरवठा रोखण्याच्या ५ मार्चच्या सरकारी आदेशाचा हवाला देऊन वितरकांनी सिलिंडर पुरवठा रोखला आहे. सरकारने याबाबत हस्तक्षेप करून स्पष्ट आदेश जारी करण्याची मागणी संघटनांकडून करण्यात येत आहे.
ऑनलाइन सिलिंडर आरक्षण होईना
मुंबईत अनेक ग्राहकांना सिलिंडर आरक्षित करण्यात अडचणी येत आहेत. ऑनलाइन सिलिंडर आरक्षण करण्याचा प्रयत्न केल्यास विनंती मान्य केली जात नाही. ‘तांत्रिक कारणामुळेतुमची मागणी नोंदवू शकत नाही, असे सांगितले जात आहे. इंधनाचा तुटवडा नसल्याचा संदेश कंपन्यांकडून पाठवला जात आहेत, मात्र सिलिंडरचे आरक्षण होत नसल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
५० टक्के हॉटेल्स बंद पडू शकतात
जर गॅस पुरवठ्याची परिस्थिती सुधारली नाही तर येत्या दोन दिवसांत शहरातील ५० टक्के हॉटेल्स बंद पडू शकतात अशी शंका हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनने (आहार) व्यक्त केली आहे. असोसिएशनने एकत्रितपणे हॉटेल्स बंद करण्याचा कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. रेस्टॉरंट्स उघडे ठेवण्याचा किंवा तात्पुरते बंद करण्याचा निर्णय वैयक्तिक हॉटेल मालकांवर आणि त्यांच्या आस्थापनांमध्ये गॅस पुरवठ्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असणार आहे.
गॅस उपलब्धतेवरील अनिश्चिततेमुळे अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सने आधीच खाद्यपदार्थांची संख्या कमी केली आहे. तसेच काही हॉटेल्सच्या चालक-मालकांनी कामकाज मर्यादित करण्यास सुरुवात केली आहे.
