मुंबई : बोरीवली (प.) येथे लागलेल्या आगीत घराते व दुचाकीचे नुकसान झाले होते. पण सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणामुळे घातपाताचा प्रकार उघडकीस आला. चार आरोपींनी तक्रारदार महिला व तिच्या कुटुंबियांना जाळण्याच्या उद्देशाने आग लावल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे. आरोपी सराईत असून त्यांच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
बोरिवली (प.) येथील गणपत पाटील नगमधील एका घराला १४ मे रोजी भीषण आग लागली होती. त्यात तक्रारदार महिला ज्युली केवट (३७) यांच्या घराचे व घराशेजारी उभ्या दुचाकीचे नुकसान झाले. सुरूवातील ही दुर्घटना असल्याचे सर्वांना वाटत होते. पण सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या तपासणीत हा घातपाताचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी देवराज सिद्धार्थ पाटील (२२) व त्याचे तीन साथीदार १४ मे रोजी पहाटे केवट यांच्या घरा शेजारी उभ्या असलेल्या दुचाकीला व घराला आग लावत असल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात दिसले. याप्रकरणानंतर केवळ यांनी नुकतीच एमएचबी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३२६ (एफ), ३३६ (जी), ३५१ (३), ३ (५), ३७ (१) व १३५ अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी देवराज सिद्धार्थ पाटील (२२) याला अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. इतर तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
मुलांमधील वादातून घर पेटवले
तक्रारदार केवळ यांचा मुलगा लकी यांचा याप्रकरणातील आरोपी शादाबसोबत वाद झाला होता. त्याने मुरारी चौधरी नावाच्या व्यक्तीची भेट घेतली. त्या कारणावरून हा वाद सुरू झाला. त्यातून आरोपींने तक्रारदार महिलेच्या मुलाला धमकावले होते. आरोपींनी १३ मे रोजी मध्यरात्री तक्रारदारारांच्या घराबाहेर उभी दुचाकी व घराला आग लावली. त्यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य घरात झोपले होते. आग लागल्यानंतर तक्रारदार महिलेला जाग आली. त्यावेळी त्यांनी बाहेर पडून आरडाओरडा केला. शेजाऱ्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली. आग कशामुळे लागल्याची तपासणी करत असताना तक्रारदार महिलेच्या हाती सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण लागले. त्यात चार आरोपींनी प्रथम तक्रारदारांच्या दुचाकीला आग लावल्याचे आणि त्यानंतर तक्रारदार महिलेच्या घराला आग लावल्याचे दिसत होते. याप्रकरणी आम्ही शुक्रवारी रात्री आरोपी देवराज पाटीलला अटक केली. आरोपी सराईत असून याप्रकरणी तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी सांगितले.