मुंबई : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग भविष्यात होऊ नये यासाठी १४ वर्षे पूर्ण झालेल्या आणि १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना एचपीव्ही लस देण्यासाठीच्या देशव्यापी लसीकरण मोहिमेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अजमेर येथून शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर नायर रुग्णालयामध्ये वयाची १४ वर्षे पूर्ण झालेल्या ५ मुलींना एचपीव्ही लस देवून मुंबईसह महाराष्ट्रातील मोहिमेचा सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि उप महापौर संजय घाडी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग जागतिक स्तरावर आणि देशात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. भारतीय महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी हा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. भारतात २०२२ मध्ये कर्करोगाचा प्रादुर्भाव १ लाख महिलांमागे १७.७ टक्के इतका होता. हा कर्करोग ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूमुळे होतो आणि हा एकमेव कर्करोग आहे, जो लसीकरणाने टाळता येऊ शकतो. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने एचपीव्ही लस ही राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्याची केंद्र शासनाला शिफारस केली.

वयाची १४ वर्षे पूर्ण झालेल्या, परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुली हा निकष लक्षात घेता, मुंबईमधील एकूण अंदाजित लाभार्थी १ लाख ३० हजार इतके आहेत. पहिल्या टप्प्यात महानगरपालिका शाळांमधील २४ हजार ९३६ लाभार्थिनीचे लसीकरण करण्यात येणार आहे. तर राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार पुढील टप्प्यात इतर खासगी व अनुदानित शाळांमधील मुलींचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम पुढील ३ महिने सलग सुरू राहील आणि त्यानंतर ती नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग होईल. लसीची सुविधा महानगरपालिकेतील २३६ आरोग्य केंद्रे, २७ प्रसूतिगृहे, १६ सर्वसाधारण रुग्णालये व ५ वैद्यकीय महाविद्यालये अशा एकूण २८४ आरोग्य संस्थांमध्ये देण्यात येणार आहे.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग जागतिक स्तरावर आणि देशात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. परंतु भविष्यात संभाव्य गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा लसीकरण करून टाळणे शक्य आहे. मुंबईतील नागरिकांनी आपल्या मुलींना या मोहिमेदरम्यान एचपीव्ही लस देऊन मुलींचे भविष्य गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून सुरक्षित करावे, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी यावेळी केले. ही लस संपूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे पालकांनी चिंता करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी नगरसेवक रोहिदास लोखंडे, नगरसेविका अमरीन अब्राहनी, राज्य आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन, राज्य आरोग्य संचालनालयाच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. शैलेश मोहिते, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, नायर दंत रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. माला दीक्षित आदी उपस्थित होते.

कसे होणार लसीकरण

लसीकरण मोहिमेअंतर्गत लाभार्थी मुलींना ‘गार्डसिल-४’ या एचपीव्ही लसीची एक मात्रा (०.५ मिली) डाव्या दंडावर स्नायूमध्ये दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर त्यांच्या डाव्या तर्जनीच्या नखावर मार्कर पेनने खूण करण्यात येणार आहे. हे लसीकरण ऐच्छिक असून त्यासाठी पालकांच्या संमतीची आवश्यकता आहे. प्रतिकूल घटना व्यवस्थापनासाठी प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असतात. आवश्यकता भासल्यास नजीकच्या शासकीय, महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय किंवा राज्य रुग्णालयामधे संबंधित व्यवस्था करण्यात आली आहे.

लसीकरणाची नोंदणी

सर्व मुलींची एचपीव्ही लसीकरणासाठीची नोंदणी आणि प्रमाणपत्र वाटप हे केंद्र शासनाकडील ‘यु-विन’ पोर्टलद्वारे पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केले जाणार आहे.

लसीकरणानंतरची संभाव्य लक्षणे

एचपीव्ही लस दिल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा इंजेक्शनच्या ठिकाणी सूज येऊ शकते, जी २-३ दिवसात बरी होते. प्रत्येक केंद्रावर त्वरित उपचारासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत. तथापि, गंभीर आजार असलेल्या मुली, ज्यांना यीस्टची ॲलर्जी आहे किंवा ज्या गर्भवती आहेत, त्यांनी ही लस देण्यात येणार नाही.

मुंबईमध्ये २० हजारांपेक्षा अधिक लसीच्या मात्रा उपलब्ध

एचपीव्ही मोहिमेसाठी मुंबई महानगरपालिकेला सद्यस्थितीत एचपीव्ही लसीच्या २० हजार १६० मात्रा प्राप्त झाल्या आहेत. ही मोहीम मुंबई महानगरपालिकेमध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महानगरपालिकास्तरीय अधिकारी, २६२ वैद्यकीय अधिकारी, १००८ परिचारिका, ४४२८ आशा सेविका व आरोग्य स्वयंसेविका यांना प्रशिक्षण दिले आहे. ही मोहीम शालेय शिक्षण विभाग, महिला व बाल विकास व इतर शासकीय विभागाच्या समन्वयाने महानगरपालिका स्तरावर राबविण्यात येईल.