मुंबई : राज्य मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या मुंबई विभागातील तब्बल सात हजार ५०० शिक्षकांचे मानधन महिनाभरापासून रखडले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली असून जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेचे काम न करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. मात्र बँक ऑफ इंडियाच्या गैरकारभारामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप शिक्षक संघटनाकडून करण्यात आला आहे. तसेच संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने दरवर्षी बारावीच्या निकालानंतर काही दिवसांतच उत्तरपत्रिका तपासणीचे मानधन शिक्षकांच्या खात्यात जमा केले जाते. यंदा २ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला. मात्र, १ जून उजाडला तरी बहुतांश शिक्षकांना मानधन मिळालेले नाही.

मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सरचिटणीस प्रा. मुकुंद आंधळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विभागीय शिक्षण मंडळाने सुमारे ९ हजार ८०० शिक्षकांच्या मानधनासाठी जवळपास दोन कोटी रुपयांचा निधी वाशी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जमा केला होता. हा निधी २५ एप्रिल, ७ मे आणि ११ मे रोजी तीन टप्प्यांत बँकेकडे वर्ग करण्यात आला. मात्र, त्यापैकी केवळ दोन हजार शिक्षकांनाच मानधन मिळाले असून उर्वरित शिक्षक ते मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. शिक्षण मंडळाने निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही तो वेळेत शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यात बँकेला अपयश आले आहे. परिणामी, हजारो शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क उशिरा भरल्यास दंड आकारला जातो, मात्र शिक्षकांचे मानधन रखडल्यास त्यांना कोणतीही भरपाई मिळत नाही, अशी नाराजीही प्रा. मुकुंद आंधळकर यांनी व्यक्त केली.

या प्रकरणाची चौकशी करून संबंधित बँकेला आर्थिक दंड आकारावा, शिक्षकांना व्याजासह मानधन अदा करावे, तसेच भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती टाळण्यासाठी बँक बदलण्याचा विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली,