मुंबई : ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरील मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) घेतला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या दोन्ही मार्गिकांवर मेट्रोच्या अतिरिक्त २४ फेऱ्या होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील प्रवासी संख्या हळूहळू वाढत आहे. आजघडीला या दोन्ही मार्गिकेवरून प्रतिदिन दोन लाख ६० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. या मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होताना एमएमएमओसीएलने अपेक्षित केलेली प्रवासी संख्या अद्याप गाठता आलेली नाही. पण या मार्गिकांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. पावासळ्यात पाणी साचल्याने वा इतर तांत्रिक अडचणींमुळे उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत होण्याच्या घटना घडतात.

हेही वाचा – मुंबई : ड्रग्सच्या नावाखाली बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक

अशा वेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ‘एमएमएमओसीएल’ने पुढाकार घेत या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी २४ अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता एकूण फेऱ्यांची संख्या २८४ झाली आहे.

हेही वाचा – ‘गो गोवा गॉन’; पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन आरोपीला पकडलं, विमानतळावर येताच गोवा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

पावसाळ्यात मेट्रो गाड्यांमध्ये वा मेट्रो मार्गिकेवर तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता आपत्कालीन परिस्थितीसाठी ‘एमएमएमओसीएल’कडून तीन अतिरिक्त मेट्रो गाड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. एकूणच पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, मेट्रो सेवा सुरळीत सुरू राहावी यासाठी ‘एमएमएमओसीएल’ सज्ज असल्याचे सांगण्यात येत आहे.