मुंबई : केंद्र सरकारने नुकताच सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ८९२ रुपयांवरून ५ हजार ३२८ केला आहे. एकीकडे हमीभावात ४३६ रुपये वाढ करून सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेतल्याचा डोंगारा पिटत आहे. पण, दुसरीकडे खाद्यतेलांवरील आयातशुल्क २७.५ टक्क्यांवरून १६.५ टक्क्यांवर आणल्यामुळे दिलेला हमीभाव शेतकऱ्यांना मिळू नये, अशी तजवीजही करून ठेवली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात पुन्हा दराची कोंडी होऊन सोयाबीन मातीमोल होण्याची भीती आहे.
केंद्र सरकारने २८ मे रोजी सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ८९२ रुपयांवरून ५ हजार ३२८ केला आहे. हमीभावात ४३६ रुपये वाढ केली आहे. केंद्र सरकारने उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा गृहीत धरून हमीभाव दिल्याचा दावा केला आहे. पण, लगेच ३० मे रोजी कच्च्या खाद्यतेलांवरील आयातशुल्क २७.५ टक्क्यांवरून १६.५ टक्क्यांवर आणला आहे. त्यामुळे दिलेला हमीभाव शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता दुरापास्त झाली आहे.
गत हंगामात सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ८९२ रुपये होता. पण, खासगी बाजार आणि बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा दर चार हजार रुपयांच्या वर गेला नाही. त्यामुळे एक तर शेतकऱ्यांना सोयाबीन प्रति क्विंटल सरासरी ८०० रुपये तोटा सहन करून विकावे लागले अन्यथा हमीभाव खरेदी केंद्रांवर रांगा लावाव्या लागल्या. गत हंगामात बहुतांश शेतकऱ्यांना सोयाबीनचा हमीभाव मिळाला नाही.
यंदा हमीभावात वाढ केली असली तरीही कच्च्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात तब्बल अकरा टक्क्यांनी घट केल्यामुळे यंदाच्या हंगामातही हमीभाव मिळण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. हमीभाव ५ हजार ३२८ केला असला तरीही सोयाबीनचे चार हजाराच्या घरातच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा दराची कोंडी होऊन सोयाबीन मातीमोल होण्याची भीती आहे.
अमेरिकेतून जीएम सोयाबीन आयात करू नका
गतवर्षी सोयाबीनला हमीभाव मिळाला नाही, यंदाही मिळणार नाही. अमेरिका – चीनच्या व्यापार युद्धात चीनने अमेरिकेकडून सोयाबीन घेण्याचे बंद करून ब्राझीलकडून खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे जागतिक सोयाबीन बाजारावर दबाव आहे. अमेरिकेतून जीएम सोयाबीन आयात झाले तर सोयाबीनच्या दरात आणखी घसरण होईल, असे मत शेती प्रश्नाचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी व्यक्त केले.