Navi Mumbai International Airport: घोषणेपासूनच चर्चेत आणि प्रसंगी वादातही सापडलेलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) बांधून तयार झालं आणि आता त्यावरून काही प्रमाणात प्रवासी वाहतूकदेखील सुरू झाली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी वाहतूक टप्प्याटप्प्याने नवी मुंबई विमानतळावर हलवून त्यानंतर मुंबई विमानतळाच्या पुनर्विकासाचं काम हाती घेण्याचं नियोजन या विमानतळाची मालकी असणाऱ्या अदाणी उद्योग समूहाचं होतं. त्यानुसार त्यांनी विमान कंपन्यांना आवाहनदेखील केलं. बऱ्याच चर्चांनंतर भारतीय विमान कंपन्या यासाठी तयार झाल्या, पण आता विदेशी कंपन्यांनी या प्रक्रियेला होकार देण्यात अनुत्सुकता दर्शवली आहे.
मुंबई विमानतळावर प्रवासी वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झाला असून तो कमी करण्यासाठी या विमानतळाचं विस्तारीकरण केलं जाणार आहे. त्यासाठीच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इथली प्रवासी वाहतूक वळवून त्यानंतर इथे काम करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. मार्च २०२७ पर्यंत मुंबई विमानतळावरील प्रवासी वाहतूक पूर्णपणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवण्याचं लक्ष्य त्यासाठी निश्चित करण्यात आलं आहे. मात्र, विमान कंपन्यांकडून यासंदर्भात अदानी समूहाच्या नियोजनानुसार प्रवासी वाहतूक हलवण्याबाबत अनुत्सुकता दर्शवली जात आहे.
आधी देशी कंपन्या, आता विदेशी विमान कंपन्या!
याआधी भारतीय विमान कंपन्यांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडली होती. अखेर अदानी समूहाच्या प्रयत्नांनंतर भारतीय विमान कंपन्या आपली प्रवासी वाहतूक नवी मुंबईत वळवण्यासाठी तयार झाल्या आहेत. त्यात इंडिगो, एअर इंडिया, अकासा एअर या विमान कंपन्यांचा समावेश आहे. मात्र, आता विदेशी कंपन्यांनी यासंदर्भात काही आक्षेप नोंदवले आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.
बुधवारी यासंदर्भात मुंबई एअरलाईन ऑपरेटर्स कमिटी(AOC) व मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) यांच्यात जवळपास दीड तास बैठक झाली. मात्र, त्यानंतरदेखील विदेशी विमान कंपन्यांनी आपली भूमिका कायम ठेवली असून वाहतूक नवी मुंबईत वळवण्याच्या प्रक्रियेबाबत अधिक सविस्तर तपशील या कंपन्यांकडून मागण्यात आला आहे. तर दुसरीकडे MIAL मात्र, मार्च २०२७ पर्यंत हे काम पूर्ण करण्यावर ठाम आहे.
Emirates विमान कंपनीचे चे आक्षेप काय?
एमिरेट्स ही संयुक्त अरब अमिरातीमधील एक विमान कंपनी असून त्यांच्याकडून या बैठकीत काही आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. जागतिक स्तरावरील विमान कंपन्यांची विमान वाहतूक हाताळण्याइतकी व्यवस्था नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अद्याप आलेली नसल्याचं एमिरेट्सनं नमूद केलं. तर दुसरीकडे Air France-KLM नं ही कल्पनाच खोडून काढली असून दोन विमानतळांमध्ये प्रवासी वाहतूक विभागली जाण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात प्रभावी ठरणार नाही, अशी भूमिका मांडली आहे.
