मुंबई : शहरातील शिक्षण संस्थांना धमक्यांचे सत्र सुरूच असून गेल्या दोन महिन्यांत १० हून अधिक आंतरराष्ट्रीय शाळा व शैक्षणिक संस्थांना धमक्यांचे ई-मेल प्राप्त झाले आहेत. धमकीच्या ई-मेलसाठी स्वीडन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, नॉर्वे या देशांच्या व्हीपीएनचा वापर करण्यात आला आहे. आरोपींनी विविध ई-मेलद्वारे धमक्या पाठवल्या असल्या, तरी त्यातील मजकूर सारखाच असल्यामुळे या मागे एकाच व्यक्तीचा हात असल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मुंबईतील शाळांना धमकीचे ई-मेल पाठवल्याप्रकरणी आतापर्यंत पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण प्रत्यक्षात मे व जून या दोन महिन्यांत ११ आंतरराष्ट्रीय शाळा व शैक्षिणक संस्थांना धमकीचे ई-मेल आले आहेत. त्यात डोंबिवलीतील एक शाळा आणि पवईतील नामांकीत शिक्षण संस्थेचा आहे. आरोपीने धमक्यांच्या ई-मेलमध्ये मुंबईवर हल्ला करणारा अजमल कसाब, संसंदेवर हल्ला करणारा अफजल गुरू, तसेच हैदराबाद येथील बलात्कार प्रकरणाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

त्यात आरडीएक्स, तसेच बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली आहे. सर्व ई-मेलमधील मजकूर सारखाच आहे. आरोपीने पोलीस व सुरक्षा यंत्रणांना फसवण्यासाठी ई-मेल पाठवण्यासाठी बहुतांश वेळा परदेशी व्हीपीएनचा वापर केला आहे. त्यात नॉर्वे, ऑस्टेलिया, स्वीडन, अमेरिका या देशांच्या व्हीपीएनचा समावेश आहे. काही ई-मेलमध्ये दिल्लीतील व्हीपीएनचा वापर करण्यात आला आहे.

पण प्रत्यक्षात आरोपी देशातून ईमेल पाठवत असल्याचा संशय आहे. अफवा पसरवणे, सार्वजनिक शांतता भंग करणे अशा विविध कलमांतर्गत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत. मुंबईतील विलेपार्ले, कांदिवली, गोवंडी, समता नगर, पवई, डोंबिवली अशा विविध ठिकाणच्या शाळांना धमकीचे ई-मेल आले आहेत. त्यापैकी सर्व शाळा या आंतरराष्ट्रीय आहेत. तसेच पवईतील एका नामांकीत शिक्षण संस्थेलाही धमकीचा ई-मेल आला आहे. आठवड्यात गोवंडी आणि कांदिवली येथील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे ई-मेल प्राप्त झाले होते.

कांदिवलीतील शाळेला नुकताच धमकीचा ई-मेल प्राप्त झाला होता. त्यापूर्वी विलेपार्ले येथील शाळेच्या ई-मेल आयडीवर बुधवारी (ता.२४ जून) पहाटे ४.३० च्या सुमारास ई-मेल प्राप्त झाला होता. हा प्रकार शाळेतील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर सुरक्षा रक्षकांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर मुख्य सुरक्षा अधिकारी संजय तोणपी यांनी स्वतः मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून धमकीच्या ई-मेलची माहिती दिली. तपासणीत काहीच सापडले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याप्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच दिवशी पश्चिम उपनगरातील शाळेलाही अशाच प्रकारे धमकीचा ई-मेल प्राप्त झाला आहे. बहुतांश ई-मेलसाठी हॉटमेल व आऊटलूक ई-मेलचा वापर करण्यात आला आहे. आरोपीने एका ई-मेल आयडीवरून पहिला व त्यावरून दुसरा असा ई-मेल बनवला आहे. नाखिरान डॉट गोपाळ, दिविज प्रभाकर लक्ष्मी अशा नावांचा वापर करून ई-मेल आयडी बनवण्यात आले आहेत. पालक व विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन यापूर्वीच पोलिसांकडून करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणांमागे खोडसाळपणा असल्याचे स्पष्ट झाले आहे.