मुंबई : अमेरिका – इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. मुंबईपासून हजारो मैल दूर सुरु असणाऱ्या या युद्धाचा अगदी थेट परिमाण इथल्या सांस्कृतिक जीवनावर झाला नसला तरीही इराणशी नाते सांगणाऱ्या इथल्या समुदायात मात्र अस्वस्थता पसरली आहे. मुंबई आणि इराणचे व्यापारी संबंध आजही असून इराणमधून येऊन मुंबईत स्थायिक झालेल्या समुदायाचे आपल्या मूळ संस्कृतीशी भावबंध जोडलेले आहेत.

मुंबईने देशभरातीलच नव्हे तर जगभरातील विविध देशातील व्यापारांना आकर्षित केले आहे. मागील अनेक शतकांपासून विविध राजवटीच्या अमलांखाली असणारी मुंबई ही भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते. भारत आणि पर्शियाचे (इराण) व्यापार संबंध अगदी हडप्पा संस्कृतीपासून होते. मुंबई आणि इराणचे व्यापारसंबंधही अनेक वर्षे जुने आहेत. ब्रिटिशकाळात हा व्यापार अधिक वाढला. झोराष्ट्रियन (पारशी) आणि बहाई समुदाय आधीपासूनच मुंबईत राहत होते.

ब्रिटिश काळात इराण – मुंबई व्यापार वाढला

इराणमधील शिया मुसलमान समुदाय एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातील मुंबईत आला. ब्रिटिश काळात १८३० ते १८६० या काळात इराण आणि मुंबईचा व्यापार सर्वोच्च पातळीवर होता. याच काळात इराणमधील शिया मुसलमान समुदाय मुंबईत स्थलांतरित झाला. या समुदायाची वस्ती प्रामुख्याने डोंगरी, इमामवाडा, उमरखाडी आदी भागात आहे. मुंबईचे व्यापारी संबंध पर्शियन आखातातील बुशेहर आणि बंदर अब्बास यांसारख्या बंदरांशी होते. त्या काळी वाफेवर चालणाऱ्या जहाजांमधून व्यापारी, यात्रेकरू यांचा प्रवास होत असे.

ब्रिटिशकाळात कोणत्या वस्तूंचा व्यापार चाले ?

इराणमधून तेथील प्रसिद्ध गालिचे, अत्तर, गुलाबपाणी, सुकामेवा ,कच्चे रेशीम, घोडे, तसेच विविध पर्शियन वस्तू मुंबईत आयात केले जात असत. तसेच मुंबईतून तांदूळ, तूप, मसाले, सागवान लाकूड, कापड आणि वस्त्रे आदी माल इराणमध्ये निर्यात होत असे. आजही मुंबईतील अनेक बाजारपेठांमध्ये सुकामेवा, गालिचे, अत्तर वगैरे माल इराणमधून आणला जातो.

शहरात इराणी खाद्य संस्कृतीचा वारसा मोठा असून इथले ‘इराणी कॅफे’ प्रसिद्ध आहेत. तसेच डोंगरी परिसरातील हाजी मुहम्मद हुसेन शिराझी या मुंबईत राहणाऱ्या श्रीमंत इराणी व्यापाऱ्याने १८५८ साली बांधलेली ‘मुघल मशीद’ ही पर्शियन शैली आणि नक्षीने सजलेली मशीद या शहरात असलेल्या पर्शियन खुणा आहेत. ही वास्तू म्हणजे तत्कालीन मुंबईचे बुशेहर आणि बंदर अब्बाससारख्या बंदरांशी असलेले सागरी व्यापारमार्ग यांचे सहज स्मरण करून देते.