मुंबई : पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या दक्षिण पादचारी पुलावर तिकीट तपासणीदरम्यान तिकीट तपासनीस आणि एका प्रवाशामध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या घटनेत तिकीट तपासनीस जखमी झाला. त्यानंतर उभयतांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या दक्षिण पादचारी पुलावर संध्याकाळी ५ वाजता तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत होती. त्यावेळी तेथे तिकीट तपासनीस (टीटीई) आशीष गुप्ता कर्तव्यावर होते. प्रवाशांकडे ते तिकीटाबाबत विचारणा करीत होते. एका प्रवाशाकडे तिकीटाबाबत विचारणा केली असता त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर सदर प्रवाशाने अचानक मारहाण केल्याचा दावा गुप्ता यांनी केला. या घटनेची माहिती मिळताच, रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्याचवेळी अंधेरी रेल्वे पोलिसांना माहिती देण्यात आली. चौकशीत संबंधित प्रवाशाने आपले नाव अजय (३१) असल्याचे सांगितले. तो अकोला जिल्ह्यातील रंका नगर परिसरातील रहिवासी असल्याचीआहे. या प्रकरणाचा तपास अंधेरी रेल्वे पोलीस करीत असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
१५ बॉडी कॅमेरे आणि ३० जॅकेटची व्यवस्था
मुंबई विभागात सुमारे १,०६४ तिकीट तपासणी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांची कर्तव्याची स्थानके, भरारी पथकातील कर्मचाऱ्यांची लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये; तसेच विशेष तपासणी मोहीम वेगवेगळ्या ठिकाणी असते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात १५ बॉडी कॅमेरे आणि ३० विशेष काळ्या रंगाची जॅकेटची व्यवस्था करण्यात येत आहे. तिकीट तपासणीसाठी लागणारी आवश्यक उपकरणे सहजपणे ठेवता यावीत, यासाठी जॅकेटमध्ये विविध कप्पे आणि खिसे असतील. त्यात एचएचटी उपकरण, ईएफटी मशीन, ओळखपत्र, नावाची पट्टी तसेच अन्य आवश्यक साहित्य ठेवता येणार आहे. जीपीएस यंत्रणा बसविण्याचे काम प्राथमिक स्तरावर सुरू आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
रेल्वे सुरक्षा पथकाला घटनास्थळी लवकर पोहोचणे शक्य जीपीएस यंत्रणेमुळे पथक नेमके कुठे कार्यरत आहे आणि गरजेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ कुठून पाठवता येईल, यासाठी जीपीएसची मदत होणार आहे. जीपीएसमुळे कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांचे लोकेशन उपलब्ध झाल्यानंतर एखाद्या स्थानकावर अचानक तिकीट तपासणीसाठी अतिरिक्त कर्मचारी आवश्यक असल्यास जवळच्या परिसरातील पथक तातडीने तैनात करता येईल. त्यामुळे भरारी पथकाचे नियोजन अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे. तसेच तिकीट तपासणीदरम्यान प्रवाशांशी वाद, धक्काबुक्की किंवा अन्य अनुचित घटना घडल्यास संबंधित तिकीट तपासनीसाचे नेमके ठिकाण त्वरित समजू शकणार आहे. त्यानुसार रेल्वे सुरक्षा पथकाला घटनास्थळी लवकर पोहोचणे शक्य होईल.
