मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयातील डॉक्टरांची बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती नोंदवण्यात येते. जोगेश्वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्राॅमा केअर रुग्णालयातील डॉक्टरांनी बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवावी यासाठी जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत तीनवेळा वैद्यकीय अधीक्षकांकडून परिपत्रक जारी करण्यात आले. मात्र खासगी रुग्णालयामध्ये रुग्णसेवा करणाऱ्या या डॉक्टरांकडून उपस्थितीच्या परिपत्राला केराची टोपली दाखवली जात आहे. परिणामी हजेरीपटावर उपस्थितीची नोंद असली तरी रुग्णालयात डॉक्टर नसल्याने रुग्णांना अन्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठविण्यात येत आहे. त्यामुळे जोगेश्वरी, बोरिवली, मालाड येथील रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमधील डॉक्टरांना कर्तव्यावर रूजू होताना व कर्तव्य समाप्तीनंतर फेस पंचिंगद्वारे हजेरी नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांनी डॉक्टरांच्या उपस्थितीसंदर्भात जानेवारी २०२६ पासून तीनवेळा परिपत्रके काढली आहेत. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण बांगर, डॉ. हनुमंत वायकुळे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये उपस्थितीसंदर्भातील परिपत्रके काढली होती. मात्र त्याकडे रुग्णालयातील डॉक्टरांकडून दुर्लक्ष करण्यात आले. सध्या वैद्यकीय अधीक्षक असलेले डॉ. बलराम बसवंत यांनी फेस रेकग्निशनच्या माध्यमातून उपस्थिती नोंदविण्याबाबत डॉक्टरांना आदेश दिले आहेत. हे परिपत्रक काढून १५ दिवस उलटले तरीही अद्यापपर्यंत एकाही डॉक्टराकडून बायोमेट्रिक उपस्थिती नोंदविली जात नाही.

हजेरी पटावर स्वाक्षरीऐवजी फक्त अद्याक्षर उपनगरीय रुग्णालयातील अनेक डॉक्टर (विशेष वैद्यकीय सल्लागार) हे खासगी रुग्णालये व क्लिनिकमध्ये रुग्णसेवा देत असतात. या डॉक्टरांचा खासगी रुग्णालयामध्ये सेवा पुरविण्याकडे अधिक कल असतो. अनेक डॉक्टर हे आठवड्यातून एकदाच रुग्णालयात येऊन हजेरी नोंदवहीमध्ये नोंद करतात. ही नोंद करताना ते फक्त त्यांच्या नावाचे अद्याक्षर लिहितात. त्यांची स्वाक्षरी करत नाही. बऱ्याचदा हे अद्याक्षर अन्य कोणत्यातरी व्यक्तीमार्फत केले जाते. त्यामुळे त्यांच्याकडून बायोमेट्रिक उपस्थिती नोंदविण्यास विशेष वैद्यकीय सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टरांकडून तीव्र विरोध करण्यात येतो.

रुग्णांचे हाल

खासगी रुग्णालयामध्ये रुग्णसेवा देणारे हे डॉक्टर महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये फार कमी वेळा येतात. त्यामुळे रुग्णालयांमध्ये संबंधित उपचारासंदर्भात स्वतंत्र विभाग असला तरी डॉक्टर उपलब्ध नसल्याचे प्रकार सर्रास घडतात. त्यामुळे बऱ्याचदा गंभीर स्थितीमध्ये आलेल्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना अन्य रुग्णालयात पाठविले जाते. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते.

परिपत्रकातील आदेश नव्या परिपत्रकानुसार बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच तांत्रिक अडचण असल्यास विभागप्रमुखांच्या मजुरीने उपस्थिती नोंदविण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच व्हाट्सॲप, मेसेजेस किंवा तोंडी सूचनांना मान्यता दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.