मुंबई: जोगेश्वरी (पश्चिम) येथील वैशाली नगर परिसरातील गोमती वैशाली चाळ या सहामजली इमारतीच्या तळमजल्यावरील विद्युत मीटर केबिनला शुक्रवारी पहाटे आग लागली. आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग ६.१८ वाजता पूर्णपणे आटोक्यात आणली. या आगीत ११ जण जखमी झाले.

आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार आग ही केवळ मीटर कॅबिनमधील विद्युत वाहिन्या व विद्युत उपकरणांपुरती मर्यादित होती. मात्र, आगीमुळे इमारतीत धूर पसरल्याने रहिवाशांना श्वासोच्छवासाचा त्रास झाला. या घटनेत एकूण ११ जण जखमी झाले असून त्यात ७ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यापैकी सलीम नूर मोहिद्दीन तडवी (७५) आणि मुमताज सलीम तडवी (६७) हे भाजले असून त्यांना पुढील उपचारासाठी कूपर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. उर्वरित नऊ जणांवर ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल असलेल्यांमध्ये युसुफ मिथा (५५), समीरा मिथा (५५), इरफान मिथा (४६), बिल्किस मिथा (७०), मोहम्मद अमीर मिथा (८०), हुसा मिथा (४०), इरफा मिथा (१३), मेहरागिज बटावाला (६४) आणि अली अशाद बटावाला (३३) यांचा समावेश आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, विद्युत बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.