मुंबई : जोगेश्वरी – विक्रोळी जोडमार्ग (जेव्हीएलआर) ते नवीन जोडमार्ग (पहिला टप्पा) प्रस्तावित मिसिंग लिंक प्रकल्पात अडथळा बनलेली ओशिवरा परिसरातील ८७ बांधकामे महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाने मंगळवारी जमीनदोस्त केली. या बांधकामांमुळे प्रकल्पाचे काम काही काळ रखडले होते.

महानगरपालिकेने जोगेश्वरी-विक्रोळी जोड मार्ग (जेव्हीएलआर) ते नवीन जोड मार्ग (पहिला टप्पा) प्रस्तावित मिसिंग लिंकचे काम सुरू केले होते. या प्रकल्पाचा टप्पा-१ आणि २ पूर्ण झाल्यानंतर बेहराम बाग परिसरातील उत्तर-दक्षिण वाहतुकीच्या बाबतीत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, वीरा देसाई विस्तारित मार्ग, त्याचप्रमाणे बेहराम बाग मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. या मार्गात ओशिवरा परिसरातील बांधकामांमुळे अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे, संबंधित ८७ बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये ८६ निवासी आणि एका व्यावसायिक बांधकामांचा समावेश आहे. यापैकी २९ पात्र बांधकामे असून ५८ अपात्र बांधकामे आहेत.

‘के पश्चिम’ प्रशासकीय विभागांतर्गत कार्यरत परिरक्षण, अतिक्रमण निर्मूलन व अनुज्ञापन, विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही कारवाई केली. २ पोकलेन, ३ जेसीबी आणि अन्य वाहनेही या कारवाईसाठी तैनात करण्यात आली होती. ओशिवरा पोलीस ठाण्याकडून उपलब्ध झालेल्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.