कमला मिलमधील बळी हे महापालिकेच्या गलथानकारभाराचे पाप: राष्ट्रवादी

पबमालकासह महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी

गुरुवारी रात्री साडे बाराच्या सुमारास 'वन अबव्ह' या पबमध्ये आग लागली.

कमला मिलमधील आगीप्रकरणी पब मालकासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे.

कमला मिलमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये होरपळून १४ लोकांचा मृत्यू झाला असून या घटनास्थळाला सचिन अहिर यांनी भेट देवून पाहणी केली. या घटनेची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी अहिर यांनी केली. कमला मिलच्या कंपाऊंडमधील ‘१ अबव्ह’ रेस्तराँ आणि पबला मध्यरात्री भीषण आग लागली आणि त्यामध्ये १४ लोकांचा नाहक मृत्यू झाला. या घटनेबाबत अहिर म्हणाले, या पबबाबत स्थानिक लोकांच्या मोठयाप्रमाणात तक्रारी होत्या. या परिसरामध्ये अवैध बांधकामेही असून फायरच्या नियमांचेही उल्लंघन केले जाते. परंतु मुंबई महानगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने हा भीषण प्रकार घडला असून यामध्ये पबमालकावर गुन्हा दाखल कराच परंतु महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली.

मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे असे प्रकार वारंवार घडत असून लोकांना नाहक बळी पडावे लागत आहे. दरम्यान या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि यामध्ये बळी पडलेल्या लोकांना जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, ज्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलेल्या लोकांच्या दु:खात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी आहे असे अहिर यांनी म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai kamala mills compound fire ncp demands strict actions against bmc officials