मुंबई: परळ येथील मुंबई महापालिकेच्या किंग एडवर्ड स्मारक रुग्णालय अर्थात केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास शिवसेना (ठाकरे) पक्षाने विरोध दर्शवला आहे. सोमवारी शिवडी विधानसभेच्यावतीने आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली केईएम रुग्णालयात निदर्शने करण्यात आली. मंत्री मंगलप्रभात लोढा मुंबईत जे टॉवर बांधत आहेत त्यापैकी एका टॉवरमध्ये एखादे धर्मादाय रुग्णालय बांधावे व त्याचे नाव लोढा यांनी त्याने हवे ते द्यावे असा खोचक सल्ला चौधरी यांनी दिला आहे.परळ येथे मुंबई महापालिकेचे केईएम हे १०० वर्षे जुने रुग्णालय आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्ण येतात. आता १०० वर्षे जुन्या केईएम रुग्णालयाचे नाव

बदलण्याचा प्रस्ताव मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आरोग्य समितीला दिला होता. केईएम रुग्णालयाचे नामकरण ”कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय” असे करण्यात यावे अशी सूचना लोढा यांनी केली आहे.त्यांच्या या सूचनेला आरोग्य समितीने गेल्या आठवड्यात मंजूरी दिली असून त्याबाबतचा ठराव अभिप्रायासाठी मुंबई महापालिका प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. नामांतराचा ठराव मंजूर झाल्यानंतर आता राजकारणाच्या पटलावर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने या नामांतराला विरोध दर्शवला असताना आता शिवसेना (ठाकरे) पक्षानेही या निर्णयाला विरोध केला आहे.

केईएम रुग्णालय हे शिवडी विधानसभेच्या हद्दीत येते. शिवडी विधानसभा मतदारसंघ शिवसेना (ठाकरे) पक्षाचा बालेकिल्ला असून या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी केईएमच्या नामांतराला कडाडून विरोध करण्याचे ठरवले आहे. सोमवारी पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि वरळी, शिवडी मतदारसंघातील सर्व नगरसेवकांना केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले.

लोढा हे मुंबईत जे टोलेजंग टॉवर बांधत आहेत त्यातील एका टॉवरमध्ये एखादे धर्मादाय रुग्णालय बांधावे व त्याचे नाव त्यांनी सुचवल्याप्रमाणे द्यावे अशी उपरोधिक सूचना अजय चौधरी यांनी केली आहे. केईएमच्या नामांतरास परळच्या जनतेचा विरोध असून हा प्रयत्न आम्ही परळवासी सहन करणार नाही असा इशारा चौधरी यांनी दिला आहे. तसेच आरोग्य समितीमधील प्रस्ताव रद्द करावा अशीही मागणी त्यांनी केली आहे.

रस्ते आत घेऊन बिझनेस वाढवला …किशोरी पेडणेकर यांचा आरोप यावेळी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी लोढा यांच्यावर टीका केली. लोढा यांनी नको त्या भानगडीत पडू नये, इमारतीच्या बांधकामात रस्ते आत घेऊन तुम्ही कसा व्यवसाय वाढवला त्याचे पुरावे बाहेर काढण्याचा इशारा यावेळी पेडणेकर यांनी दिला.

अल्टामाऊंटचेही नाव बदला ….

वाळकेश्वर परिसरातील अल्टामाऊंट रस्त्याचे नाव मुंबई महापालिकेने बदलले असून त्याचे नामकरण एस के बडोदावाला असे केले आहे. पण या मार्गावर लोढा यांनी बांधलेल्या टॉवरला लोढा अल्टा माऊंट असे नाव का दिले आहे असा सवाल नगरसेवक सचिन पडवळ यांनी केला आहे. आपल्या टॉवरला इंग्रज काळातील अधिकाऱ्याचे नाव देण्याचा दुटप्पी पणा लोढा यांनी केला असल्याचा आरोपही पडवळ यांनी केला आहे.