मुंबई : मुंबईतील विविध प्रश्नांबाबत महापौर यांना पाठविलेल्या पत्रांवर उत्तर न मिळाल्याने विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी त्याबाबत विचारणा करण्यासाठी शुक्रवारी महापौर दालन गाठले. त्यावेळी त्यांनी महापौर कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली. याबाबतची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसिद्ध झाल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी याबाबत संताप व्यक्त केला. तसेच, पेडणेकर यांनी महापौर दालनात घुसखोरी करून कर्मचाऱ्यांवर दमदाटी केली. तसेच, रेकी केली असे आरोप तावडे यांनी केले आहेत. याप्रकरणी पेडणेकर यांच्याविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.

मुंबईत शुक्रवारी सकाळी कोसळत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे यांनी विविध ठिकाणी पाहणी दौरे आयोजित केले होते. घाटकोपर, शिवडी अग्निशमन केंद्र, कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक, रे रोड आदी ठिकाणी त्यांनी पाहणी करून विविध बाबींचा आढावा घेतला. दरम्यान, विरोधीपक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शुक्रवारी दुपारी पाऊणे चारच्या सुमारास महापौर कार्यालयात प्रवेश केला. ३० मार्च रोजी पाठविलेल्या पत्रावर अद्याप उत्तर प्राप्त का झालेले नाही, याबाबत पेडणेकर यांनी थेट महापौर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली. प्रश्नांचा भडीमार केल्याने कर्मचारीही गोंधळले. या प्रकाराची माहिती मिळताच महापौर रितू तावडे प्रचंड संतप्त झाल्या.

किशोरी पेडणेकर यांनी परवानगीविना महापौर दालनात येऊन तेथील कर्मचाऱ्यांवर दमदाटी केली. तसेच पाठविलेल्या पत्रांवर उत्तरे न मिळाल्याने त्यांनी तेथील कागदपत्रेही चाळल्याचा आरोप तावडे यांनी केला. तसेच, महापौर दालनात हे अत्यंत संवेदनशील ठिकाण असून त्याठिकाणी प्रशासकीय, मुंबई व नागरिकांशी संबंधित विविध गोपनीय कागदपत्रे असतात. अशा ठिकाणी घुसखोरी करून पेडणेकर यांनी रेकी केल्याचा गंभीर आरोपही तावडे यांनी केला.

दरम्यान, महापौर कार्यालयात कागदपत्रे चाळल्यानंतर त्यांनी महापौरांच्या खासगी सचिवांना गोपनीय कागदपत्रे घेऊन विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात बोलाविण्याचेही तावडे म्हणाल्या. अशी वागणूक विरोधी पक्षनेत्यांना शोभत नाही. महापौर दालन हे सर्वसामान्य जनतेचेच असून ते कधीही त्याठिकाणी येऊ शकतात. मात्र, पेडणेकर यांनी नियमांचे उल्लंघन केले असून ही बाब खपवून घेतली जाणार नाही. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात पेडणेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे महापौर तावडे यांनी सांगितले.

मुंबईकरांविषयी तळमळ असेल तर रस्त्यावर उतरून काम करा. महापालिकेतील वातानुकूलित दालनात बसून विकासकामे होत नाहीत. कोविडकाळात शिवसेनेतील (ठाकरे) नेत्यांनी घरात बसून काम केले, तसे करू नये. चोरपावलांनी महापौर दालनात येऊन दमदाटी करण्याऐवजी रस्त्यावर उतरून नागरिकांशी संवाद साधा, असा टोला तावडे यांनी पेडणेकरांना लगावला.