मुंबई: रस्ते वाहतुकीचा वारंवार उडणारा बोजवारा पाहता मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर सर्वसामान्यांसाठी जलवाहतुकीचा पर्याय पुन्हा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने सुरु आहे. मुंबई ते विजयदुर्ग या कोकण जलवाहतुकीचा चार महिन्यापूर्वी करण्यात आलेला प्रयोग फसल्यानंतर सरकारने कोकण किनारपट्टीसाठी नव्या पध्दतीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या प्रवासी जहाजांऐवजी सुमारे १०० प्रवासी क्षमतेच्या लहान जलवाहतूक सेवांचे जाळे उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात एका खासगी कंपनीशी चर्चा सुरू असल्याची माहिती बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.
कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच किनारी जिल्ह्यांना परस्पर जोडणारी नियमित प्रवासी जलवाहतूक उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे पर्यटनाबरोबरच स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन प्रवासालाही मोठा पर्याय उपलब्ध होणार आहे. कोकणाला प्रवासी जल वाहतुकीचा मोठी परंपरा आहे. गेली अनेक वर्ष ही परंपरा खंडित झाल्यानंतर राणे यांच्या प्रयत्नाने एक मार्च रोजी मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान प्रवासी जलवाहतूक सुरू करण्यात आली होती. समुद्रमार्गे जलद आणि आरामदायी प्रवास हा त्यामागचा उद्देश होता. या सेवेचे तिकीटदर तुलनेने जास्त होते. त्याचबरोबर प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या सेवेचे तीनतेरा वाजले. हवामानावरील अवलंबित्व, देखभाल खर्च, हंगामी स्वरूपातील सेवा आणि आर्थिक व्यवहार्यता या कारणांमुळे ही सेवा अल्पावधीतच बंद पडली.
कोकण किनारपट्टीवर व्यापक जलवाहतुकीचे स्वप्न काही काळासाठी मागे पडले आहे. सरकारने मोठ्या जहाजांच्या ऐवजी लहान, कमी खर्चिक आणि स्थानिक गरजांनुसार चालणाऱ्या जलवाहतुकीचा पर्याय स्वीकारला आहे. सुमारे १०० प्रवासी क्षमतेच्या बोटी विविध किनारी शहरांदरम्यान धावतील. त्यामुळे प्रवासी संख्या, संचालन खर्च आणि तिकीटदर यामध्ये समतोल साधणे शक्य होईल, असा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. या नव्या आराखड्यामुळे अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, दापोली, गुहागर, जयगड, रत्नागिरी, देवगड, मालवण, वेंगुर्ले यांसारख्या किनारी भागांना टप्प्याटप्प्याने जलमार्गाने जोडण्याची संधी निर्माण होऊ शकते. रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होण्याबरोबरच पर्यटनाला चालना, मत्स्य व्यवसायाला पूरक सुविधा आणि किनारी भागातील स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची अपेक्षा असल्याचे राणे यांनी सांगितले.
कोकणात जलवाहतूक यशस्वी करण्यासाठी केवळ बोटी सुरू करणे पुरेसे ठरणार नाही. आधुनिक जेट्टी, सुरक्षित प्रवासी टर्मिनल, ऑनलाइन तिकीट व्यवस्था, परवडणारे भाडे, नियमित वेळापत्रक आणि वर्षभर सातत्याने सेवा उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे. पावसाळ्यातील समुद्री परिस्थिती लक्षात घेऊन सुरक्षिततेचे उच्च निकषही पाळावे लागणार आहेत. सरकार ह्या सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहे. खाजगी जलवाहतूक संचालन कंपन्यांनी पुढाकार घेतला तर ही वाहतूक सुरळीत सुरू होऊ शकते असे राणे यांनी सांगितले. मोठी प्रवासी जलवाहतुक सेवा सुरु केल्यानंतर काही उणिवा आमच्या लक्षात आलेल्या आहेत असे ते म्हणाले.
