मुंबई : मुंबई उपनगरातील पाच कोळीवाड्यांच्या पूर्वीच्या सीमांकनाव्यतिरिक्त वाढीव क्षेत्राचे सीमांकन करण्याचा, तसेच तीन नवीन कोळीवाड्यांचे सीमांकन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल व वन विभागाने याविषयीचा शासन निर्णय जारी केला असून या कामासाठी नियुक्त समितीने तीन महिन्यांच्या आत शिफारशींसह सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील एकूण २९ कोळीवाड्यांपैकी २३ कोळीवाड्यांचे सर्वेक्षण यापूर्वी पूर्ण झाले आहे, मात्र या सर्वेक्षणात काही कोळीवाड्यांची क्षेत्रे समाविष्ट झाली नव्हती. तसेच काही कोळीवाडे सर्वेक्षणातून वगळले गेल्याबाबत लोकप्रतिनिधींनी निवेदने दिली होती. या पार्श्वभूमीवर वाढीव क्षेत्राचे आणि सर्वेक्षणात समावेश न झालेल्या कोळीवाड्यांचे सीमांकन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. यानुसार खारदांडा, जुहू कोळीवाडा, जुहू मोरागाव कोळीवाडा, मढ आणि वर्सोवा या पाच कोळीवाड्यांच्या यापूर्वी निश्चित केलेल्या हद्दीव्यतिरिक्त वाढीव क्षेत्राचे सीमांकन करण्यात येणार आहे.

तीन नवीन कोळीवाड्यांचा समावेश

याशिवाय, नगर भूमापन अधिकारी, बोरिवली यांच्या कार्यालयाच्या अधीन असलेल्या दहिसर गावठाण, कांदरपाडा गावठाण-दहिसर आणि कांदरपाडा गावठाण-एकसर या तीन नवीन कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यात येणार आहे.

तीन महिन्यांत अहवाल देण्याचे निर्देश

कोकण विभागातील उपसंचालक, भूमी अभिलेख यांच्या नियंत्रणाखाली यापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या समितीने अन्य कोळीवाड्यांच्या सीमांकनासाठी अवलंबलेल्या कार्यपद्धतीनुसार ही कार्यवाही करावी, असे शासनाने स्पष्ट केले आहे. समितीच्या अध्यक्षांना आवश्यकतेनुसार अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी किंवा तज्ज्ञ व्यक्तींना बैठकीसाठी विशेष निमंत्रित म्हणून बोलावण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत. समितीने शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत स्वयंस्पष्ट अहवाल आणि शिफारशी सादर करायच्या आहेत. या निर्णयामुळे संबंधित कोळीवाड्यांच्या वाढीव क्षेत्राच्या हद्दी निश्चित करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळणार आहे.