मुंबई : मुंबईसह कोकण प्रदेशातील कमाल तापमानात वाढ झाली असून उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. मागील काही दिवसांपासून मुंबईत कमाल तापमान अधिक नोंदले जात आहे. रविवारीही सांताक्रूझ केंद्रात ३५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. सोमवारी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात२९.८ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात ३२.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यामुळे रविवारच्या तुलनेत मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला.

फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यापासून राज्यभरातील कमाल तापमानात वाढ झाली आहे. कोकण प्रदेश आणि मुंबईत उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. रविवारी फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत दुसऱ्यांदा मुंबई येथे ३५ अंश सेल्सिअसच्या वर पारा गेला. यापूर्वी ४ फेब्रुवारी रोजी हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. रविवारीही

३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जे सामान्य कमाल तापमानाहून ३.६ अंशांनी जास्त होते. यामुळे रविवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान मुंबई येथे नोंदले गेले. त्यामुळे मुंबईत उकाडा वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान, सोमवारी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २९.८ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात ३२.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्यामुळे रविवारच्या तुलनेत कमाल तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसची घट झाली आहे. तसेच ठाणे येथील कमाल तापमान ३४.६, डहाणू ३३.९, रत्नागिरी ३३.९ तर अलिबाग येथे ३० अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

हवामानात हळूहळू बदल होत असून किमान तापमानातही चढ-उतार होत आहेत. सोमवारी कोकण प्रदेशात १९ ते २३ अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमानाची नोंद झाली. मुंबईत कुलाबा केंद्रात २२.७ तर सांताक्रूझ केंद्रात २०.४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. दरम्यान, पुढील तीन दिवसात राज्यातील दक्षिणेकडील भागातील किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान विभागाचा इशारा काय ?

दरम्यान, मुंबईसह कोकण पट्ट्यात उकाड्यात वाढ होईल हा इशारा कायम असून कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होईल अशा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या दरम्यान कोकण पट्ट्यातील काही भागातील कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक म्हणजेच ३५ ते ३७ अंश सेल्सिअस इतके राहील असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.