मुंबई: कुर्ला पश्चिम येथे बुधवारी मध्यरात्री पूर्ववैमनस्यातून तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करून एका व्यक्तीची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
कुर्ला पश्चिम येथील हलावपूल परिसरात बुधवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास ही घटना घडली. या परिसरात रात्री उशीरापर्यंत नागरिकांची वर्दळ सुरू असते. मध्यरात्री अचानक तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी बाबा येलप्पा पवार याच्यावर पाच गोळ्या झाडल्या. त्यानंतर आरोपींनी धारदार हत्याराने पवारवर वार केले. या हल्ल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बाबा येलप्पा पवार याला कुर्ला पश्चिम येथील भाभा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून दोन जणांना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
