मुंबई: मित्राच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असताना, मुलीने त्याला विरोध केल्याने आरोपीने तिची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना कुर्ला येथे घडली आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून ३६ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. मृत मुलगी आई-वडील आणि दोन लहान भावांसोबत राहत होती. मुलीच्या लहान भावाला कावीळची लागण झाल्याने त्याच्यावर मुंबईत अनेक ठिकाणी उपचार करण्यात आले. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर मुलीच्या वडिलांनी त्याला त्यांच्या मूळगावी उत्तर प्रदेश येथे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मृत मुलीचे वडील, आई तिच्या भावाला घेऊन १० ऑक्टोबरला गावी जाणार होते. त्याचवेळी घरात मोठी मुलगी आणि एक लहान मुलगा असल्याने त्यांनी सोबतीला त्यांचा मित्र रामसिंह यादव (३६) याला घरी बोलावून घेतले होते. १० ऑक्टोबरला पहाटे साडेचार वाजताची गाडी असल्याने ९ ऑक्टोबरला रात्रीच मुलीचे आई-वडील आणि तिचा भाऊ लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दाखल झाले होते. यावेळी घरात अल्पवयीन मुलगी तिचा लहान भाऊ आणि आरोपी असे तिघेजण होते. याचवेळी आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
मात्र मुलीने त्याला विरोध केल्याने त्याने मुलीचा गळा आवळला. तसेच तिच्या डोक्यावर देखील प्रहार करून तिची हत्या केली. पहाटे चारच्या सुमारास त्याने मुलीच्या वडिलांना फोन करून मुलगी बेशुद्ध पडल्याचा बनाव रचला. त्यामुळे वडिलांनी गावी न जाता पुन्हा घर गाठले. घरी येऊन त्यांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासात गळा आवळून हत्या झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. तशी माहिती तेथील डॉक्टरांनी पोलिसांना दिली.
त्यानुसार पोलिसांनी मुलीच्या वडिलांकडे अधिक चौकशी केली असता घटनेच्यावेळी घरात त्यांचा मित्र उपस्थित असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ या आरोपीला ताब्यात घेतले असता, पहिल्यांदा त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने बदनामीच्या भीतीने मुलीची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून पोलीस त्याच्याकडे अधिक तपास करत आहेत.
