मुंबई : कुर्ला मदर डेअरीची २१ एकर जागा धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनाकरिता धारावी पुनर्विकास प्रकल्पास (डीआरपी) हस्तांतरीत करण्यात आली. त्यानुसार या जागेवरील पाडकाम सध्या कंत्राटादारांकडून सुरु आहे. या कामादरम्यान बेकायदेशीररित्या, कोणतीही परवानगी न घेता परिसरातील अंदाजे ३० झाडे कापल्याचा आरोप कुर्ल्यातील रहिवाशांनी केला. याविरोधात मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. तसेच पोलिसांनीही तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा आरोपही रहिवाशांनी केला आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनाकरिता मुंबईत विविध ठिकाणच्या जागेची मागणी करण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत डीआरपीला काही ठिकाणच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्यात कुर्ला मदर डेअरीच्या २१ एकर जागेचाही समावेश आहे. ही जागा धारावी पुनर्वसनसासाठी देण्यास कुर्ल्यातील रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. यासाठी लोक चळवळीच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. ही जागा धारावीसाठी देण्याचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी राज्य सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने केली जात आहे. मात्र त्या मागणीकडे दुर्लक्ष करून २१ एकर जागा सरकारने डीआरपीकडे हस्तांतरीत केली. ही जागा ताब्यात आल्यानंतर त्या जागेवरील बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली. पाडकाम करताना कंत्राटदाराकडून बेकायदेशीररित्या झाडे कापली जात असल्याचा आरोप कुर्ल्यातील रहिवासी विद्या इंगवले यांनी केला.
कुर्ला मदर डेअरीच्या परिसरातून शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास काही आवाज आल्याने काही रहिवासी मदर डेअरीत गेले. त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणावर झाडे कापण्यात आल्याचे दिसले. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांकडे झाडे कापण्यासंबंधीचे परवानगी पत्र दाखविण्याची मागणी केली. मात्र त्यांनी कागदपत्रे दाखविण्याऐवजी अरेरावीची भाषा करत रहिवाशांना धक्काबुक्की करुन बाहेर काढल्याचे इंगवले यांनी सांगितले. यासंदर्भात १०० क्रमांकावर तक्रार केल्यानंतरही पोलिसांनी हे प्रकरण गंभीर्याने घेतले नाही, तसेच पालिसांनी आमची तक्रार नोंदवून घेण्यासही टाळाटाळ केल्याचे त्यांनी सांगितले.
बेकायदा वृक्षतोडीविरोधात पालिकेच्या उद्यान विभागाकडे अधिकृत तक्रार करण्यात आली असून याप्रकरणी कंत्राटदार तसेच जबाबदार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याची माहिती लोक चळवळीचे पदाधिकारी किरण पैलवान यांनी दिली. याविषयी उद्यान विभागाकडे विचारणा केली असताना त्यांनी तक्रार आल्याबरोबर शनिवारी एका अधिकाऱ्यास घटनास्थळी पाठवले होते. मात्र तिथे असा कोणताही प्रकार घडल्याचे निदर्शनास आल्याचे नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र रहिवाशांकडून बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याचे सांगितले जात असल्याबाबत विचारल्यानंतर त्यांनी सोमवारी स्वत: जाऊन पाहणी करु असे सांगितले. दरम्यान कर्मचाऱ्यांकडून रहिवाशांना कोणतीही धक्काबुक्की करण्यात आली नसल्याचे कंत्राटदारांकडून सांगण्यात आले आहे. ००० वृक्षतोडीबाबत रहिवाशांना अर्ज सादर करण्यास सांगितले. त्यांचा अर्ज येताच पुढील कार्यवाही केली जाईल. – संजय पोपळघाट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नेहरू नगर पोलीस ठाणे कोणतीही तक्रार वा माहिती अद्याप आपल्यापर्यंत आली नसल्याची माहिती डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. महेंद्र कल्याणकर यांनी लोकसत्ताला दिली.
