मुंबई : कुर्ला येथील नौपाडा परिसरातील महापालिकेच्या शाळेजवळील एका दुकानावर भलेमोठे झाड पडल्याची दुर्घटना घडली असून त्यात ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सातत्याने झाडे पडून नागरिकांचे जीव जात असल्याने प्रशासनाविरोधात नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे झाडे पडून होणाऱ्या मृत्यूचा विषय ऐरणीवर आला आहे. नुकतेच दोन दिवसांपूर्वी सांताक्रुझमध्ये झाड पडून आठजण जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर रविवारी सकाळी दादर परिसरात एका घराच्या छतावर झाड पडले. त्यामुळे छत तुटून फांदी घरात शिरली. सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही.
या घटनेला काही तास उलटतात तोच कुर्ल्यात दुकानावर झाड कोसळल्याची दुर्घटना घडली. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून महानगरपालिकेला माहिती प्राप्त झाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. त्या दुर्घटनेत युनूस कुंडावाला (६३) हे गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना तातडीने नजीकच्या फौजिया रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
गेल्याच महिन्यात १० मे रोजी खार पश्चिमेतील लिंकिंग रोडवर बांधकाम स्थळावरील एक मोठे झाड कोसळून रिक्षावर आदळल्याने दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या. या दुर्घटनेत १४ वर्षीय आरिका श्रीवास्तव हिचा मृत्यू झाला होता. तसेच, हर्षिता कुमार (२३) गंभीर जखमी झाली होती.
