मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी या सात धरणात मिळून रविवारी सकाळी ८८.७० टक्के पाणीसाठा आहे. गेल्या आठवड्यात ९० टक्क्यांपुढे पोहोचलेला पाणीसाठा आता पावसाने ओढ दिल्यामुळे कमी झाला आहे. त्यामुळे मुंबईत सध्या लागू असलेली पाणी कपात मागे घेण्याची शक्यता कमी झाली आहे. अद्याप पावसाचे दोन महिने असून या दोन महिन्यात किती पाऊस पडतो यावर पाणीपुरवठ्याचे भवितव्य अवलंबून आहे.
यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात जलाशयातील पाणीसाठा साडे सहा टक्क्यांपर्यंत कमी झाला होता. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली. सात जलाशयांपैकी मुंबईच्या हद्दीत असलेले विहार आणि तुळशी हे दोन्ही तलाव जुलैच्या पहिल्याच आठवड्यात १०० टक्के भरल्यामुळे ओसंडून वाहू लागले. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने ओढ दिल्यामुळे पाणीसाठ्यातील वाढ निम्म्यावरच थांबली होती. परंतु त्यानंतर जुलै महिन्याच्या अखेरीस मुंबई महानगर परिसरात पडलेल्या पावसामुळे ३ ऑगस्टला पाणीसाठा ९० टक्क्यांपुढे गेला. त्यामुळे पाणी कपात रद्द होणार अशी आशा निर्माण झाली होती. पाणी कपात रद्द करण्याची मागणीही होऊ लागली होती. मात्र गेल्या आठवड्याभरात पुन्हा पावसाने ओढ दिल्यामुळे पाणीसाठा खालावू लागला आहे. त्यामुळे पाणी कपात पुढचे काही दिवस तरी कायमच राहणार आहे.
११ टक्के तूट
सातही जलाशयातील पाणीसाठ्यात मिळून सध्या सुमारे ११ टक्के तूट आहे. २०१८ मध्ये पाणीसाठ्यात नऊ टक्के तूट राहिल्यामुळे वर्षभर १० टक्के कपात करण्यात आली होती. त्यामुळे अजून दोन महिन्यात किती पाऊस पडतो यावर पाणी पुरवठ्याचे भवितव्य अवलंबून आहे.
एक टक्का पाणी तीन दिवस पुरते
धरणाच्या पाणीसाठ्यात एक टक्का वाढ होते तेव्हा ते पाणी तीन दिवस पुरते. ३० सप्टेंबरपर्यंत जर धरणे १०० टक्के भरली तरच तो पाणीसाठा पुढच्या मे किंवा जूनपर्यंत किंवा पाऊस सुरू होईपर्यंत पुरतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून धरणे १०० टक्के भरली तरी मे महिन्यात राखीव साठ्याला हात घालावा लागतो. त्यातच यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिलेले असल्यामुळे पाण्याचा काटेकोर वापर महापालिकेला करावा लागणार आहे. त्यामुळे सध्यातरी पाणी कपात मागे घेण्याबाबतचा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढच्या दोन महिन्यात पाऊस न पडल्यास पाणीसाठा आणखी कमी होऊ शकतो. त्यामुळे आताच पाणी कपात रद्द करणे शक्य नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोणत्या धरणात किती पाणी
उर्ध्व वैतरणा ….८०.१४ टक्के
मोडक सागर …..९९.९९ टक्के
तानसा ……….९८.७७ टक्के
मध्य वैतरणा ……….९०.५५ टक्के
भातसा………८६.२८ टक्के
विहार……..१०० टक्के
तुळशी……….९९.८७ टक्के
एकूण …….८८.७० टक्के
