मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रा पावसाने दमदार हजेरी लावली असून केवळ २४ तासांत धरणांमध्ये सुमारे १५०० मिमी पाऊस बरसला. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात तब्बल १२ टक्क्यांनी वाढ झाली. रविवार आणि सोमवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे ७.५१ टक्के पाणीपातळी वाढली होती. त्यानंतर मंगळवारी १२ टक्क्यांची वाढ झाल्याने गेल्या तीन दिवसांत धरणांतील जलसाठा २८.२९ टक्क्यांवर पोहोचला. परिणामी, पावसाने पाठ फिरवल्याने मुंबईकर व प्रशासनाची वाढलेली चिंता देखील काही प्रमाणात कमी झाली आहे.

मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी सुमारे ४००० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र यंदा जुलै उजाडला तरीही धरणांत पावसाने हजेरी लावली नव्हती. मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असला तरीही धरणे कोरडी असल्याने प्रशासनासह नागरिकांची डोकेदुखी वाढली होती. मात्र, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारपासून पावसाने दमदार हजेरी लावली. या तीन दिवसांतच धरणातील जलसाठ्यात एकूण १९.५१ टक्के वाढ झाली.

शनिवार, ४ जुलै रोजी धरणांत ९.४१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मात्र, रविवार आणि सोमवारी पाणीपातळीत प्रत्येकी ३.७८ टक्के आणि ३.७३ टक्के वाढ झाली. त्यानंतर मंगळवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार २४ तासांत १५९७ मिमी इतका पाऊस कोसळून पाणीसाठ्यात तब्बल १२ टक्के वाढ झाली. सद्यस्थितीत सातही धरणांतील एकूण जलसाठा २८.२९ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये ३६३४ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, उर्ध्व वैतरणामध्येही दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी २१२ मिमी पाऊस पडला.

सद्यस्थितीत उर्ध्व वैतरणामध्ये १२.२५ टक्के, मोडकसागरमध्ये ५२.२२ टक्के, तानसामध्ये ४२.८५ टक्के, मध्य वैतरणामध्ये २६.१२ टक्के, भातसामध्ये २४.५० टक्के, विहारमध्ये ९८.९८ , तर तुळशीमध्ये ९५.८८ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा जरी कमी असला, तरीही सध्याच्या परिस्थितीनुसार मुंबईकर व प्रशासनासाठी ही बाब मोठी दिलासादायक आहे.

तीन वर्षातील पाणीसाठा

वर्ष – पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

७ जुलै २०२६ – ४१८६४९ (२८.९२)

७ जुलै २०२५ – ९८२४१३ (६७.८८)

७ जुलै २०१४ – २१०२०७ (१४.५२)

दोन दिवसातील धरणातील पावसाची नोंद

उर्ध्व वैतरणा -२१२ मिमी, मोडकसागर – ३४५ मिमी, तानसा – ३२२ मिमी, मध्य वैतरणा – २३५मिमी, भातसा – १७२ मिमी, विहार – १५१ मिमी, तुळशी – १६० मिमी