मुंबई : विधि अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेत ९२.९३ पर्सेंटाइल गुण मिळालेल्या विद्यार्थीनीने १३ हजार रुपये शुल्क भरल्यानंतर प्रवेश प्रक्रियेत आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे तिला प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे. प्रवेश निश्चित न झाल्यामुळे विद्यार्थीनीचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चैताली राजेश महाडिक असे या विद्यार्थिनीचे नाव असून, तिला विधि अभ्यासक्रमाच्या सीईटीत ९२.९३ पर्सेंटाइल मिळाले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी तीन वर्षांच्या विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत तिला अंधेरी येथील श्री राजस्थानी सेवा संघाच्या विधि महाविद्यालयात प्रवेश मिळाला.

चैतालीने मूळ कागदपत्रे सादर करत २६ हजार शुल्कापैकी हप्त्यांच्या सुविधेंतर्गत १३ हजार रुपये शुल्क भरले. प्रवेश निश्चित झाल्याचे तिला महाविद्यालयाकडून सांगण्यात आले. १४ ऑक्टोबर रोजी वर्ग सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या यादीत नाव नसल्याचे तिच्या लक्षात आले. याबाबत प्रशासनाकडे विचारणा केल्यावर त्यांनी केलेल्या तपासणीत सीईटीच्या संकेतस्थळावर प्रवेशाची स्थिती ‘फी पेड बट नॉट ॲडमिटेड’ अशी दाखविण्यात येत होते.

यासंदर्भात तिने प्राचार्यांची भेट घेतली असता, त्यांनी प्रवेश प्रक्रियेत काही अडचण आल्यामुळे प्रवेश निश्चित होऊ शकला नसल्याचे सांगितले. तांत्रिक अडचणीमुळे निर्माण झालेल्या समस्येमुळे प्राचार्यांनी तिला पदविका अभ्यासक्रम वा एक वर्षाचा खंड घेण्याचा पर्याय सुचविला. तसेच पदविका अभ्यासक्रमाचे शुल्क भरण्याची तयारीही त्यांनी दर्शवल्याची माहिती चैतालीने दिली. तसेच महाविद्यालय प्रशासनाने यासंदर्भात सीईटी कक्षाकडे लेखी निवेदन देत विद्यार्थींनीच्या प्रवेशासाठी काही तरतूद आहे का याबाबत विचारणा करत दंड भरण्याचीही तयारीही दर्शवली असल्याचे चैताली हिने सांगितले.

महाविद्यालय प्रशासनाचे म्हणणे

तांत्रिक अडचणीमुळे संबंधित विद्यार्थीनीचा प्रवेश निश्चित झाला नाही. कोणीही जाणीवपूर्वक हा प्रकार केला नाही. तिचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी अन्य महाविद्यायात प्रवेशासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, ते शक्य झाले नाही. त्यामुळे तिला पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा पर्याय दिला. या अभ्यासक्रमाचे शुल्क भरण्याची तयारी महाविद्यालय प्रशासनाने दाखविली होती. तसेच तिला पुढील वर्षी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन कोट्यातूनही प्रवेश देण्याची तयारी आम्ही दाखविली आहे. यासंदर्भात सीईटी कक्षाला पत्र दिले आहे. सीईटी कक्षाने काही तोडगा काढल्यास त्यासंदर्भातील दंड भरून तिला प्रवेश देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाकडून देण्यात आली.

सीईटी कक्षाचे म्हणणे

विधि महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी चैताली महाडिक या मुलीच्या प्रवेशाबाबत विचारणा केली होती. मात्र त्यांच्या महाविद्यालयात एकही जागा रिक्त नसल्याने तिला प्रवेश देणे शक्य नाही. महाविद्यालयात जागा रिक्त असती तर या मुलीच्या प्रवेशासाठी आम्ही नक्की प्रयत्न केले असते, अशी माहिती सीईटी कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.