Ashok Vada Pav Ranked Among World’s Most Iconic Sandwiches by TasteAtlas मुंबई म्हटलं की आपसूकच आपल्या समोर येते ती मुंबईची ओळख असणारी गोष्ट. अर्थातच वडा-पाव. मुंबईत सध्याच्या घडीला रोज लाखो वडे तळले जातात आणि पाव, चटण्या यांच्याबरोबर ते मुंबईकरांची भूक भागवतात. मुंबईत अनेक ठिकाणी उत्तम वडा-पाव मिळतात. या वडापावांमध्ये एक वडा-पाव हा मुंबईतला सर्वात खास वडापाव आहे. ज्याचं नाव आहे दादरमधला अशोक वडापाव, या वडापावला किर्ती कॉलेजचा वडापाव असंही म्हटलं जातं. तिखट आणि गोड चटणी, सुकी चटणी, वड्याच्या भोवतीचा भरपूर चुरा आणि बटाटावडा अशा खास मांडणीसह हा वडापाव दिला जातो.
मुंबईकर रांग लावून हा वडापाव खातात आणि पार्सल घरी नेतात. अशोक वडापावची खासियत ही त्याची न्यारी चव तर आहेच पण आणखी एक खास गोष्ट आहे ती म्हणजे या वडापावसह मिळणाऱ्या चटण्या. त्यांच्या चवीत गेल्या कित्येक वर्षांपासून फरक पडलेला नाही. हाच अशोक वडापाव आता जगात भारी ठरलाय. याचं कारणही तसंच आहे.
अशोक वडापाव ठरला जगात भारी
Taste Atlas च्या यादीत २५व्या क्रमांकावर आपल्या मुंबईचा अशोक वडापाव जाऊन बसला आहे. त्यामुळे मुंबईतला अशोक वडापाव म्हणजेच किर्ती कॉलेजचा वडापाव हा पुन्हा चर्चेत आला आहे.अशोक वडापाव हा मुंबईतल्या किर्ती महाविद्यालयाजवळ आहे. त्यामुळे या वडापावला किर्ती कॉलेजचा वडापावही म्हटलं जातं. मागच्या पाच ते सहा दशकांपासून हा वडापाव मुंबईकरांच्या पसंतीस उतरला आहे. या वडापावच्या चवीत आजही फरक पडलेला नाही हे विशेष. त्यामुळेच वडापाव प्रेमींचं अशोक वडापाववर विशेष प्रेम आहे. हाच वडापाव आता टेस्ट अॅटलासच्या उत्कृष्ट सँडविचेसच्या यादीत २५ व्या क्रमांकावर जाऊन बसला आहे. मुंबईतल्या अशोक वडापावला TasteAtlas च्या बेस्ट सँडविचेसच्या यादीत २५ वं स्थान मिळालं आहे. या वडापावला ४.१ स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. शिवसेनेचा उदय झाल्यानंतर अशोक वडापाव सुरु झाला आणि त्याची प्रसिद्धी लोकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली असंही TasteAtlas ने नमूद केलं आहे. मुंबईतलं ‘वर्कलाइफ’ हे अत्यंत धकाधकीचं आणि घाईचं आहे. अशा वातावरणात अशोक वडापाव हा अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस उतरला. वडापाव हा मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचा भाग झाला आहे. तसंच वडापाव हा मुंबईची ओळख बनला आहे यात शंका नाही.

मुंबईतल्या वडापावचा इतिहास काय सांगतो?
मुंबईतल्या वडापावचा इतिहास हा साधारण साठच्या दशकातला आहे. ओगले काकू यांनी वडापाव सुरु केला असं म्हटलं जातं. काहीजण अशोक वैद्य यांनी पहिल्यांदा वडे तळले आणि ते पावासह लोकांना खाऊ घातले आणि इथून वडापावचा जन्म झाला असं सांगितलं जातं. तर काही जण आणखी काही वेगळ्या कहाण्याही सांगतात. पण मुंबईत वडा-पाव प्रसिद्ध होण्याचं कारण ठरलं ते म्हणजे गिरणी कामगार. स्वस्तात पोटभर जेवणासारखा पर्याय म्हणून वडा-पावकडे पाहिलं गेलं आणि त्यामुळेच वडापाव हा मुंबईकरांचं पूर्णान्न झाला. सुरुवातीला काही पैशांमध्ये मिळणारा वडापाव आता बराच महाग झालाय. १० पैशांना मिळणारा वडापाव अनेक दिवस १ रुपया ते पाच रुपये या किंमतीत मिळत होता. आता मात्र वडापावची किंमत २० ते २५ रुपयांच्या घरात गेली आहे. काही भागांमध्ये ३० ते ५० रुपये या किंमतीतही वडापाव विकला जातो. मुंबईकर खवय्यांचं वडापाववरचं प्रेम मात्र काही कमी झालेलं नाही.

मुंबई कुठे उत्तम वडापाव मिळतो? जाणून घ्या निवडक ठिकाणं
१) अशोक वडापाव, मुंबईतल्या प्रसिद्ध वडापाव पैकी हा वडापाव आहे. अनेक सेलिब्रिटींनीही या वडापावचा आस्वाद घेतला आहे. तसंच त्यांचा हा आवडता वडापाव आहे. रांग लावून लोक हा वडापाव खातात.
२) मुंबईतल्या भायखळा भागात पूर्वेला ग्रॅज्युएट वडापाव मिळतो. मागील अनेक वर्षांपासून हा वडापाव लोकांच्या पसंतीस उतरतो आहे.
३) मुंबईतल्या गिरगावात असलेला बोरकर वडापाव हा देखील मुंबईकरांना खूप आवडतो. बोरकरांच्या वड्यात काजू आणि शेंगदाणे आहेत. तसंच या वडापावसह मिळणारी चटणी खवय्यांना खूप आवडते.
४) मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस या ठिकाणी आराम वडापाव मिळतो. या वडापावची चटणी ही देखील तेवढीच खास असते. श्रीरंग तांबे यांनी हे हॉटेल सुरु केलं. आरामचा वडापाव चीझ ग्रिल्ड, बटर ग्रील्ड, शेजवान ग्रील्ड वडापाव या प्रकारांमध्येही वडापाव मिळतो. तांबे कुटुंबाची तिसरी पिढी या व्यवसायात आहे.
५) लाडूसम्राट या ठिकाणी मिळणारा वडापाव हा देखील खास आहे. या वडापावसह मिळणारी खोबऱ्याची चटणीही तेवढीच लोकांना खूप आवडते.
६) मिठीबाई कॉलेजच्या जवळ मिळणारा शिवाजी वडापाव हा देखील हा देखील लोकांना खूप आवडतो. एका दिवसात एक हजार वडे तळण्याचा विक्रम या स्टॉलने केला आहे. या ठिकाणी शेजवान, चीज, बटर वडापावही मिळतो. पार्ले भागातला हा वडापाव पार्लेकरांना खूप आवडतो.
७) विलेपार्ले स्टेशनच्या समोर मिळणारा सम्राट वडापावही खूप प्रसिद्ध आहे. या वडापावासह मिक्स भजीही मिळतात. हा वडापाव खाण्यासाठी लांबून लोक येतात.
८) दादरचा श्रीकृष्ण वडा हा देखील मुंबईकरांना आवडतो. या वड्याची खासियत म्हणजे या वड्यासह पाव मिळत नाही. या वड्याची चटणी आणि मिरच्या या देखील रुचकर असतात.
