मुंबई : नमस्कार, आप सबका एअर बोरिवली में स्वागत है, जिनको भी सीट मिली है वो ॲटिट्यूड कम रखे .जिनको नहीं मिली वो अगले स्टेशन का इंतजार करे. घडयाळ्याच्या काट्यावर धावणारे मुंबईकर आणि मुंबईकरांच्या जीवनाचा महत्वाचा घटक असलेल्या उपनगरीय लोकलचे देशी आणि परदेशी नागरिकांना आकर्षण आहे. याच लोकलमध्ये मुंबईतील एका तरुणाने प्रवाशांसमोर एअऱ होस्टेसच्या पोषाखात विमानातील उद्घोषणांचे सादरीकरण केले. प्रणय जोशी या तरुणाचा एअऱ बोरिवली नावाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कंटेंट क्रिएटर प्रणय जोशीला त्याच्या एका फॉलोअरने लोकलमध्ये एअर होस्टेससारखे कपडे घालून एअरलाइनच्या शैलीत घोषणा करण्याचे आव्हान दिले होते. आव्हान स्वीकारुन प्रणयने लोकल प्रवास सुरु करण्यापूर्वी एअर होस्टेसचा युनिफॉर्म भाड्याने घेतला. डब्यात शिरण्यापूर्वीच, “मी पुरुषांच्या डब्यात बसतो की स्त्रियांच्या डब्यात?” अशी थट्टा करून त्याने वातावरण निर्मिती केली. एअर होस्टेसच्या कपड्यातील मुलगा पाहून प्रवाशांमध्ये हशा पिकला.
गर्दीने भरलेल्या डब्यात शिरल्यावर प्रवाशांच्या नजरा विचित्र पोशाखाकडे गेल्या. अनेक प्रवासी आश्चर्याने मागे वळून पाहू लागले, तर काहींनी तो क्षण आपल्या फोनमध्ये चित्रित करायला सुरुवात केली. प्रवाशांमध्ये उभे राहून, जोशी यांनी एअरलाइन केबिन क्रूची आठवण करून देणाऱ्या स्वरात विनोदी उद्घोषणी केली.
“नमस्कार, आप सबका एअर बोरिवली में स्वागत है, जिंको भी सीट मिली है वो ॲटिट्यूड कम राखे .जिंको नहीं मिली वो आगले स्टेशन का इंतजार करे,.“दो द्वार आगे की तरफ, दो द्वार पिचे की तरफ, पर प्लॅटफॉर्म किधर आएगा वो मुझे नहीं पता… आपत्कालीन स्थितीमे अपनी नजरदीकी चैन को तुरंत खेच ले.”
मतभेद
व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताच त्यावर वेगाने प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी त्यातील सर्जनशीलता आणि विनोदाची प्रशंसा करत, मुंबईच्या दैनंदिन जीवनाचा एक ताजेतवाना करणारा पैलू म्हटले. काहींनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर सोशल मीडिया कंटेटसाठी व्यासपीठ म्हणून केला जावा की नाही, यावर मत मांडले.
