Mumbai Local Professor Murder Case Viral Video : मुंबई लोकल प्रवासात तुंबळ हाणामारीचे प्रकार नेहमीच घडतात. लोकलच्या अनियमित वेळा, प्रचंड गर्दी यामुळे प्रवाशांना जीव नकोसा होता. त्यातच, गर्दीत कोणाचा धक्का वगैरे लागला की यातून वादविवाद होतात. आता याचच पर्यवसन हत्येत झालं आहे. चालत्या लोकलमध्येच हत्या करण्यात आली आहे. मालाडमधील प्राध्यापक हत्येचा व्हिडिओ आता समोर आला असून चालत्या लोकलमधून उतरतानाच आरोपीने अलोक कुमार सिंग यांच्या पोटात धारदार शस्त्र खुपसले. धक्कादायक म्हणजे आजूबाजूला माणसांची एवढी वर्दळ असतानाही आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाला.
मालाड रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसतंय?
मालाड येथील घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकल फलाटावर येत असताना अनिकेत शिंदे आणि अलोक कुमार सिंग यांच्यात उतरण्यावरून भांडण झालं. उतरत असताना अनिकेत शिंदे आधी उतरला, त्याने मागे वळून मागे उभ्या असलेल्या अलोक यांच्या पोटात धारदार शस्त्र खुपसलं. शस्त्र खुपसल्यानंतर तो आपल्या वाटेने निघून गेला. त्याने मागे वळूनही पाहिलं नाही.
दरम्यान, पोटात शस्त्र खुपसल्याने अलोक ट्रेनमध्येच विव्हळत पडले. त्यानंतर पोटावर हात ठेवून ते ट्रेनमधून खाली उतरले आणि समोर असलेल्या बाकावर जाऊन बसले. या काळात आजूबाजूला वर्दळ होती. येणारे-जाणारे प्रवासी त्यांच्याकडे पाहत होते. एक-दोन प्रवासी हल्ला करणाऱ्याच्या मागोमाग धावलेही, मात्र त्याआधीच तो पसार झाला होता. भरदिवसा, वर्दळीच्या ठिकाणी एका निष्पाप प्रवाशाची हत्या झाली आणि हल्लेखोर पसार होण्यास यशस्वीही झाला.
आरोपीला ३० जानेवारीपर्यंत कोठडी
दरम्यान, १२ तासांच्या आत पोलिसांनी या आरोपीला अटक केली. आज सकाळी मालाड येथे सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी करून अटक करण्यात आली आणि आजच त्याला न्यायलायात हजर करण्यात आले असून ३० जानेवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
