मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी रविवार उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रीपासून ब्लॉक असेल.

हार्बर मार्ग

कुठे : पनवेल – वाशी स्थानकांदरम्यान अप व डाऊन हार्बर मार्ग (पोर्ट मार्ग वगळून)

कधी : सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत

परिणाम : पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने सुटणाऱ्या अप हार्बर मार्ग सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरच्या दिशेने सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्ग लोकल रद्द करण्यात येणार आहे.

ट्रान्स-हार्बर मार्गावरील पनवेलहून ठाण्याच्या दिशेने जाणारी अप ट्रान्स-हार्बर मार्ग लोकल सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ या वेळेत पनवेल येथून सुटते आणि ठाणे येथून पनवेलच्या दिशेने जाणारी डाऊन ट्रान्स-हार्बर मार्ग लोकल सेवा सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेत ठाण्याहून सुटते, या लोकलही रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी विभागावर विशेष लोकल चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ ते उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

पश्चिम रेल्वे

कुठे : मुंबई सेंट्रल आणि माहीम अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : शनिवारी रात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ पर्यंत

परिणाम : पश्चिम रेल्वेवरील पायाभूत कामांसाठी शनिवार सकाळी १० ते रविवारी रात्री १० दरम्यान वांद्रे टर्मिनस आणि वांद्रेदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार

आहे. या ब्लॉक कालावधीत वांद्रे टर्मिनस आणि वांद्रेदरम्यानचा रेल्वे फाटक क्रमांक १८ रस्ते वाहतुकीसाठी बंद राहील. तसेच रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी शनिवारी रात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ पर्यंत मुंबई सेंट्रल – माहीमदरम्यान मेगाब्लॉक असेल. या ब्लॉक कालावधीत सर्व जलद मार्गावरील लोकल सांताक्रूझ – चर्चगेट दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.