मुंबई : तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे या तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक

सांकेतिक छायाचित्र

मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे या तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत देखभाल-दुरुस्तीच्या विविध कामांसाठी अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असेल. या काळात बोरीवली ते गोरेगाव दरम्यान धिम्या मार्गावर धावणाऱ्या लोकल जलद मार्गावरून धावतील. मेगाब्लॉक दरम्यान बोरीवली स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३ आणि ४ वरून एकही लोकल धावणार नसल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.

मध्य रेल्वेवर सकाळी ११.१० ते दु. ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मुलुंड ते माटुंगा अप धिम्या मार्गावर हा ब्लॉक असेल. त्यामुळे अप धिम्या मार्गावरील वाहतूक अप जलद मार्गावरून वळवण्यात येईल. या कालावधीत नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. ठाण्याहून सुटणाऱ्या सर्व अप धिम्या लोकल सकाळी १०.३७ ते दु. ४.०२ वाजेपर्यंत अप जलद मार्गावर मुलुंड ते माटुंगामध्ये चालवल्या जातील. त्यांना मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, सायन स्थानकात थांबे दिले जातील. त्यानंतर या लोकल पुन्हा माटुंग्यानंतर अप मार्गावर वळवल्या जातील. सीएसएमटी येथून सुटणाºया सर्व जलद, अर्धजलद लोकल सकाळी १०.१६ ते दुपारी २.५४ वाजेपर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकावर थांबतील. त्यामुळे नेहमीच्या नियोजित वेळापत्रकापेक्षा दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावतील. मेगाब्लॉकच्या कामामुळे कल्याण येथून सुटणाऱ्या सर्व अप जलद, अर्धजलद लोकल या रविवारी सकाळी ११.०४ ते दु. ३.०६ या वेळेत नियोजित स्थानकांसह दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकातही थांबतील. मेगाब्लॉकचा फटका लांबपल्ल्याच्या गाड्यांनाही बसेल, या काळात दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे थांबणाऱ्या सर्व मेल आणि एक्स्प्रेस निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करण्याची मुभा आहे. सीएसएमटीहून सकाळी ११.३४ वाजल्यापासून ते दुपारी ३.३९ वाजेपर्यंत वाशी, बेलापूर, पनवेल येथे जाणाºया तसेच पनवेल, बेलापूर, वाशीहून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ वाजेपर्यंत सीएसएमटी येथे जाणाऱ्या सर्व उपनगरीय सेवा रद्द राहतील. मेगाब्लॉक काळात सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल या स्थानकांदरम्यान विशेष लोकल सेवा सुरू ठेवण्यात येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai local megablock

ताज्या बातम्या